न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०२४) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अनुदानित असलेल्या दिव्यांग भवन फाउंडेशनसाठी ४३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये एकूण ३१ संवर्गामध्ये ४० उमेदवारांची निवड करण्यात आली तर दुसऱ्या टप्प्यामध्ये ३ संवर्गामध्ये ३ उमेदवारांची निवड करण्यात आली. कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया पुर्ण झाली असून सर्व पात्र उमेदवार कामावर रुजू झालेले आहेत. अशी माहिती दिव्यांग भवनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी यांनी दिली.
दिव्यांग भवन फाउंडेशन येथे नियोजनानुसार आजतागायत १५० पेक्षा जास्त दिव्यांग व्यक्तींनी थेरपी सुविधेचा लाभ घेतला आहे. त्यासोबतच दिव्यांग भवन येथे पार पडलेल्या जनजागृतीपर कार्यक्रमामध्ये ३०० हून अधिक दिव्यांगांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवला. त्यासोबतच, १२० दिव्यांगांना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत उपकरणे देण्यात आली आहेत.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व यूडीआयडी (UDID) कार्ड धारक दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग भवन येथे भेट देऊन थेरपी सारख्या सेवा-सुविधांचा लाभ घ्यावा, असे दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांनी सांगितले. पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या दिव्यांग भवन येथे लवकरच दिव्यांग कक्ष सुरु करणार आहोत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या दिव्यांग भवनसाठी नवनियुक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील सर्व दिव्यांग व्यक्तींना सेवा-सुविधा देण्यासाठी महापालिका सदैव प्रयत्नशील आहे. दिव्यांग भवन येथे नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी दिव्यांग भवन येथे येणाऱ्या प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला समानूभुतीने सेवा द्यावी.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका…












