न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२४) :- सीबीआय अधिकारी व बँक अधिकारी असल्याचे सांगुन ६० वर्षीय इसमास अटकेची भिती घालुन १,०८,००,०००/- रु. ची फसवणुक करणारे अलवर, राजस्थान येथील आरोपीस जयपुर येथुन पिंपरी चिंचवड सायबर कडुन अटक करण्यात आली आहे.
चिंचवड येथे राहणाऱ्या इसमास आरोपींनी व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडीओ कॉल करुन एसबीआय कस्टमर सर्व्हिसेस तसेच मुंबई पोलीसचा ड्रेस घालुन सीबीआय अधिकारी व बँक अधिकारी असल्याबाबत तोतयागिरी करुन मनी लॉडरींगचे २.५ कोटी रुपयांच्या फ्रॉड केसमध्ये अटक करण्याची भिती घातली. त्यांच्या बँक खात्यातील रक्कम डिजीटल करन्सी चेक करुन ती व्हेरिफाय करुन परत करतो, असे सांगुन, तक्रारदार इसमाचा विश्वास संपादन करुन तसेच जबरदस्तीने व अप्रामाणिकपणाने एकुण १,०८,००,००० रुपये रक्कम सुपुर्द करण्यास भाग पाडुन आर्थिक फसवणुक केली.
पोलिसांच्या पथकाने कंपनीचे दोन भागीदार १) साहील मोहन मुदलियार वय २५ वर्षे रा. सर्वे नं. ७६ ते ८१, प्लॉट नं. ३७६ किरण सोसायटी, सहकारनगर, पुणे २) क्षितीज गिरीश क्षिरसागर वय २७ वर्षे रा. स. नं. १४/१५/२/१, लिला पार्क ए-१, सिंहगड रोड, वडगांव बु, पुणे व त्यांचा साथीदार नामे ३) ओंकार राम नाईक वय २८ वर्षे, रा. सर्वोदय चौक, वडार कॉलनी, विलींग्डन कॉलेज, सांगली यांचा शोध घेवुन त्यांना गुन्हयात यापुर्वी अटक केली होती.
त्यानंतर त्यांचेकडे केले तपासामध्ये व तांत्रिक तपासामध्ये गुन्हयातील फसवणुकीची रक्कम ही गुजरात, राजस्थान याभागात जात असल्याची व त्यांचे साथीदार हे गुजरात, राजस्थान येथील असल्याची माहीती मिळाल्याने पथक तात्काळ गुजरात, राजस्थान येथे रवाना केले. त्याप्रमाणे त्यांनी अथक परिश्रम व कौशल्यपुर्वक तपास करुन ऑनलाईन गुन्हे करण्यासाठी कुप्रसिध्द असलेले अलवर, राजस्थान येथील आरोपी मयंक अशोककुमार गोयल वय २० वर्षे, रा. वार्ड नं १५, गुर्जर मोहल्ला, खेरली गंज, खेरली रेल, रुरल, अलवर, राजस्थान यास जयपुर राज्य राजस्थान येथुन ताब्यात घेवुन दि. २७/०९/२०२४ रोजी १०.१६ वा. अटक केली आहे. त्याची जयपुर येथील न्यायालयातुन ट्रान्झिट रिमांड घेवुन त्यास पिंपरी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची दि. ०३/१०/२०२४ रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर आहे. त्याचेकडे गुन्हा करण्यासाठी वापरलेले बँक अकाउंट, त्यामधील व्यवहार, इतर साथीदार, त्याचा अशा प्रकारे किती गुन्हयामध्ये सहभाग आहे, इत्यादीबाबत तपास चालु आहे.
नागरीकांना आवाहन…
अशा प्रकारे येणा-या फसव्या फोनला घाबरुन जाऊ नये. तसेच अनोळखी कॉलवर विश्वास न ठेवता नजीकच्या पोलीस ठाण्यात जाऊन खात्री करुन घ्यावी. पोलीस अशा प्रकारे कोणालाही फोन करत नाहीत. अगर डिजीटल अरेस्टची भिती घालत नाहीत. कोणत्याही परिस्थितीत आपला मोबाईल, वैयक्तीक माहीती शेअर करु नये.












