- विलास लांडे आणि रवी लांडगेंमुळे भोसरी मतदार संघात ट्वीस्ट..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑक्टोबर २०२४) :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भोसरी विधानसभेचे इच्छुक माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सोमवारी (दि. ३०) भेट घेतली. तसेच, माजी आमदार विलास लांडे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांसह शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे मोठा गाजावाजा करीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडून विधानसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची पुरती गोची झाली आहे. त्यांची बेडूकउडी फसली की काय? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे भोसरी मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून कलगीतुरा रंगणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
भाजपचे माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी गेल्या महिन्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. भोसरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल, अशी ग्वाही त्यांना उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे त्यांनी मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली असून, मोर्चेबांधणी केली आहे. अशातच त्यांनी सोमवारी अचानक महाविकास आघाडीतील प्रमुख नेते असलेले शरद पवार यांची भेट घेतली. उमेदवारासाठी आशीर्वाद देण्याची विनंती त्यांनी पवारांकडे केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन अजित गव्हाणे यांनी अनेक माजी नगरसेवकांसह शरद पवार यांची तुतारी हातात घेतली आहे. अजित गव्हाणे हेदेखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्या दृष्टीने त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. शिवसेनेचे रवी लांडगे यांनी तसेच, माजी आमदार विलास लांडे यांनीही शरद पवार यांची भेट घेतल्याने महाविकास आघाडीत नक्की कोणाला उमेदवारी मिळणार, याची चर्चा रंगली आहे.
महाविकास आघाडीत भोसरी मतदारसंघ शिवसेनेला की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जाणार, याबाबत पक्षाचे पदाधिकारी दावे-प्रतिदावे करीत आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघ शिवसेना लढणार आहे. उद्धव ठाकरे यांनी वचन दिले आहे. त्यानुसार, कामाला लागलो असून, मला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते असलेले शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची भेट घेतली. भोसरी मतदारसंघ हा कुस्ती आखाडा नसून, राजकीय आखाडा आहे. शरद पवार हे राजकारणातील वस्ताद आहेत. मला तिकीट नाही मिळाले तरी, मी महाविकास आघाडीचे काम करणार आहे, असे रवी लांडगे यांनी सांगितले.













