न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑक्टोबर २०२४) :- राज्य कृषी पणन मंडळातर्फे गुरुवारी (दि. ३) निगडीतील ग. दि. माडगुळकर नाट्यगृहात राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार असल्याची माहिती राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक विकास व पणनमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित राहणार आहेत. सहकार व पणन, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, पणन संचालक विकास रसाळ, राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती प्रवीणकुमार नहाटा यांचीही उपस्थिती असणार आहे.
आधुनिकरणबाबत होणार चर्चा...
या परिषदेमध्ये राज्यातील बाजार समित्यांचे आधुनिकीकरण, बाजार समित्यांना त्यांच्या दैनदिन कामकाजात येणाऱ्या अडीअडचणी व उत्पन्नवाढीसाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत चर्चा होणार आहे. राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, सचिव, बाजार समिती संघाचे सदस्य यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेसाठी राज्यभरातून प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, असे संयोजकांनी सांगितले.













