न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२४) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता येणार आहेत. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबतची माहिती दिली.
दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन भरायचे आहेत. शाळेमार्फत अर्ज भरून घेतले जाणार आहेत. त्यामुळे माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची सरल प्रणालीमध्ये अद्ययावत नोंद करणे आवश्यक आहे. तसेच सरल प्रणालीद्वारेच नियमित विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची सोय करून देण्यात आली आहे. पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेत प्रविष्ट होणारे विद्यार्थी आयटीआयचे विद्यार्थी यांची माहिती सरल प्रणालीमध्ये नसल्याने या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज प्रचलित पद्धतीने दिलेल्या मुदतीतच भरायचे आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
राज्य मंडळाच्या सर्व माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी प्रणालीवरील ‘स्कूल प्रोफाईल’मध्ये शाळा संस्था मान्यता, विषय शिक्षक या बाबतची माहिती भरून मंडळाकडे पाठवणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची मुद्रित प्रत घेऊन विद्यार्थ्यांकडून अर्जात नमूद केलेली माहिती पडताळून ती अचूक असल्याची खात्री करणे गरजेचे आहे. पडताळणी केल्याबाबत विद्यार्थी, मुख्याध्यापकांना स्वाक्षरी करावी लागणार आहे. माध्यमिक शाळांनी परीक्षा शुल्क भरणे, शुल्क भरल्याचे चलन, विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करण्याची तारीख स्वतंत्रपणे कळवण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले.