- संरक्षक जाळीवर मारल्या उड्या; यंत्रणेची पळापळ…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑक्टोबर २०२४) :- आपल्या विविध मागण्यांसाठी गेले काही दिवस आंदोलन करणारे राज्यातील आदिवासी समाजाचे आमदार आज प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसून आले. आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मंत्रालयात आलेल्या या आमदारांना मुख्यमंत्र्यांची भेट मिळू शकली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या काही आमदारांनी थेट मंत्रालयातील पहिल्या मजल्यावर लावलेल्या संरक्षक जाळीवर उड्या मारून आपला निषेध व्यक्त केल्याचे दिसून आले.
मंत्रालयात चक्क आमदारच संरक्षक जाळीवर पटापटा उड्या मारत असल्याचे दिसल्यानंतर मंत्रालयातील सुरक्षा अधिकाऱ्यांची पळापळ झाल्याचे दिसून आले. मंत्रालयात सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनी लगेच धावून जात जाळीवर उतरलेल्या सर्व आमदारांना बाहेर काढले आहे. उड्या मारणाऱ्या आमदारांमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ, इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, पालघरचे भाजप खासदार हेमंत सावरा, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे अकोलेचे आमदार किरण लहामटे, बहुजम विकास आघाडीचे बोईसरचे आमदार राजेश पाटील या आदिवासी समाजातील आमदारांचा समावेश होता.
आदिवासी आमदारांची मागणी काय?
राज्यात धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आदिवासी आमदार गेले काही दिवस विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत आहेत. शिवाय ज्या आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांची ‘पेसा’ अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात आली होती. त्यांना नियुक्तीपत्रे देण्याची मागणी हे आमदार करत आहेत. या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय आदिवासी समाजातील आमदार आज मंत्रालयात आले होते. परंतु कॅबिनेट बैठकीत व्यस्त असल्याने मुख्यमंत्र्यांसोबत भेट होऊ शकली नाही. त्यामुळे आक्रमक झालेले आमदार सहाव्या मजल्यावरून तिसऱ्या मजल्यावर उतरले आणि तिथून पहिल्या मजल्यावर लावलेल्या संरक्षक जाळीवर उड्या मारल्या.













