- घनता जास्त असलेल्या उपनगरात पोलीस चौक्यांची संख्या ४ पेक्षा जास्त असावी – डॉ. विजयकुमार पाटील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२४) :- पिंपरी चिंचवड शहर पोलिस ठाणे हद्दीत ४ नवीन पोलीस ठाणे निर्मित करण्यास राज्य शासनाने हिरवा कंदील दिला. सध्या पिंपरी चिंचवड शहराच्या ४१२ चौरस किमी परिसरात १८ पोलीस ठाणी कार्यरत असून त्यामध्ये वाढ होऊन आता २२ पोलीस ठाणी कार्यरत असतील.
काळेवाडी, बावधन, संत तुकाराम नगर व दापोडी अशी ४ नवीन पोलीस ठाणी शहराच्या हद्दीत सुरू होतील. त्यासाठी ३८६ + ०४ (सफाई कामगार) अशी पदनिर्मिती करण्यास व त्यासाठी लागणाऱ्या एकूण खर्चासही २३,६५,९६,७०४/- (तेवीस कोटी पासष्ठ लाख शहाण्णव हजार सातशे चार रुपये) राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे.
वाकड, पिंपरी, हिंजवडी व भोसरी ठाण्यांचे विभाजन होणे काळाप्रमाणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार आता चार पोलीस ठाणी नवनिर्मित होणार आहेत. परंतु हे करत असताना घनता जास्त असलेल्या भागात पोलीस चौक्यांची संख्याही जास्त असणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ पेक्षा जास्त पोलीस चौक्या असाव्यात. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीवर पोलीस यंत्रणा योग्य पद्धतीने आळा घालेल. त्यामुळे गृह विभागाचा शासन निर्णय क्रमांक पीओएस-०८२४ /प्र.क्र.५४/पोल -३ – १० ऑक्टोबर २०२४ हा लवकरात लवकर आमलात येईल यात शंका नाही.
वाढत्या लोकसंख्येच्या विचार केला असता ह्या नवीन पोलिस ठाण्यांची आवश्यकता होती. अपुऱ्या पोलिस संख्येमुळे पोलीस यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होत होता. गेल्या २१ वर्षांपासून PNSKS राज्य संस्थेचे पोलीस मित्र, एसपीओ हे पोलीस विभागास बंदोबस्त हेतू व नागरी सुरक्षा हेतू ग्राम सुरक्षा दल अंतर्गत मदत करत आहेत. त्यामुळे शासनाच्या ह्या निर्णयाचे संस्था स्वागतच करत आहे.
– डॉ. विजयकुमार पाटील, अध्यक्ष – प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती…
















