न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२४) :- चऱ्होली बुद्रुक येथे पोस्ट डाक सुविधा सक्षम करण्यासाठी डाक विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या भागातील पोस्ट शाखेचा पूर्वी ग्रामीण पिन कोड होता. त्यामध्ये बदल करुन नवीन शहरी पिनकोड कार्यान्वयीत केला आहे. त्यामुळे पोस्ट सेवांमध्ये वाढ होणार असून, चऱ्होली आणि परिसरातील पोस्ट ग्राहकांना फायदा होणार आहे. विशेष म्हणजे, आता चऱ्होलीच्या शहरीकरणावर पोस्ट विभागाने शिक्कामोर्तब केले आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये १९९७ चऱ्होली बुद्रुकचा समावेश करण्यात आला. त्यानंतर २०१७ पर्यंत या गावात पायाभूत सोयी-सुविधा अपक्षेप्रमाणे विकसित झाल्या नाहीत. २०१७ नंतर झालेल्या विविध विकास प्रकल्प आणि मूलभूत सोयी-सुविधांमुळे चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर विकसित झाला.
चऱ्होली बुद्रुक पोस्ट कार्यालयाचा पूर्वी पिन कोड- 412 105 असा होता. सदर पिन कोड ग्रामीण भागाचा आहे. आता 411 081 हा शहराचा पिन कोड मिळाला असून, लवकरच कार्यान्वयीत होणार आहे. त्यामुळे वितरण उप डाकघर डिलिव्हरी पोस्ट ऑफीस सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे डाक खात्याच्या सुविधा त्वरीत उपलब्ध होतील. पोस्टमनची संख्या वाढेल. जास्तीत जास्त सेवा घरपोच देण्यासाठी मदत होईल. पोस्ट ग्राहकांना पूर्वी आळंदीला जावे लागत होते. मात्र, आता टपालगाडी चऱ्होलीपर्यंत येणार आहे. आर्थिक व्यवहारासाठी आळंदीला जावे लागणार नाही.
















