न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२४) :- अॅफिडेविट, प्रतिज्ञापत्रे, पार्टनरशिप नोंदणी पत्र, संमती पत्रे, बँक लोन प्रतिज्ञापत्र, रेशनकार्डसाठी पत्ता पुरावा, संमतीपत्र, भाड्याने राहणाऱ्या नागरिकांसाठी भाडेकरार यासाठी आवश्यक असलेले शंभर आणि दोनशे रुपयांचे स्टॅम्प पेपर बंद होणार नाहीत, अशी माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वतीने देण्यात आली.
दस्त नोंदणीसह विविध कामासाठी शंभर आणि दोनशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरची गरज भासत असते. मात्र, राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध कामांसाठी लागणारे शंभर आणि दोनशे रुपयांचे स्टॅम्प पेपर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलाच भुर्दंड बसणार आहे. परिणामी यामुळे राज्यातील नागरिक, विविध मुद्रांक विक्रेता संघटना यांनी नाराजी व्यक्त केली होती. ही बाब लक्षात घेऊन राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने १००, २०० रूपयांचे स्टॅम्प पेपर सुरू राहणार असल्याचे कळविले आहे.
दरम्यान असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंटचे अध्यक्ष सचिन शिंगवी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शंभर आणि दोनशे रुपयांचे स्टॅम्प पेपर सुरू ठेवण्याबाबत निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, सर्वसामान्य जनतेला नेहमी लागणारे अॅफिडेविट, प्रतिज्ञापत्रे, पार्टनरशिप नोंदणी पत्र, संमती पत्रे, बँक लोन प्रतिज्ञापत्र, रेशन कार्डसाठी पत्ता पुरावा संमती पत्र, भाड्याने राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप संमतीपत्र ही नेहमी लागणारी प्रतिज्ञापत्रे सरकारने शंभर रुपयांवरून पाचशे रुपये केल्याने गोरगरीब जनतेला पाचपट जास्त स्टॅम्प द्यावा लागणार आहे. हातावर पोट असणाऱ्या लोकांना या निर्णयाचा फटका बसणार असून राज्य शासनाने वाढीव मुद्रांक शुल्काचा पुनर्विचार करून मुद्रांक शुल्क शंभर रुपयांवरून पाचशे रुपयांवर करू नये, असे म्हटले आहे.
















