न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२४) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे गांधीनगर, पिंपरी येथील महिंद्रा कंपनीच्या जागेत सुसज्ज मुख्य अग्निशमन केंद्र प्रबोधिनीची इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी १५१ कोटी रुपयांची निविदा महापालिकेने नुकतीच प्रसिद्ध केली आहे.
महिंद्रा कंपनीकडून ‘आयटीआर’ अंतर्गत महापालिकेस मिळालेल्या जागेपैकी ६ एकर जागेत अग्निशमन विभागाची इमारत बांधण्यात येणार आहे. तेथे २२ अग्निशमन वाहने उभे राहतील अशी व्यवस्था केली जाणार आहे. एक केंद्रीय अग्निशमन कार्यालय असणार आहे. अग्निशमन संग्रहालय, २०० आसन क्षमतेचे सभागृह, ५० आसन क्षमतेचे दोन सेमिनार रूम असणार आहेत. तसेच, १०० कर्मचाऱ्यांच्या राहण्यासाठी निवासस्थान बांधण्यात येणार आहे. तेथे आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष व प्रशिक्षण केंद्र असणार आहे. या प्रकल्पाची घोषणा महापालिकेच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती.
या कामासाठी महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाने नुकतीच १५० कोटी ९१ लाख ८२ हजार १७५ रुपये खर्चाची निविदा नुकतीच प्रसिद्ध केली आहे. निविदा २३ ऑक्टोबरपर्यंत मागविण्यात आल्या आहेत. निविदा २५ ऑक्टोबरला उघडण्यात येणार आहेत.
गांधीनगर, पिंपरी येथील महिंद्रा कंपनीची जागा महापालिकेस मिळाली आहे. त्या ठिकाणी अग्निशमन विभागाचे मुख्यालय बांधण्यात येणार आहे. अग्निशमन विभागासाठी आवश्यक ते सर्व बंब व साहित्य तसेच, मनुष्यबळ २४ तास उपलब्ध असणार आहे. तेथे १८ मीटर रुंदीचे रस्ते आहेत. सीमाभिंतीजवळ असलेले शौचालय इतरत्र हलविण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.
















