- फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग्स हटविण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑक्टोबर २०२४) :- महाराष्ट्र राज्य सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ ची घोषणा आज भारत निवडणूक आयोगाने केली आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता देखील लागू झाली असून या आदर्श आचार संहितेची सर्व प्रशासकीय यंत्रणांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत.
सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. निवडणूक आयोगामार्फत आदर्श आचारसंहितेची मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून यामधील सूचनांचे पालन करून आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असे देखील आयुक्त सिंह यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात नियमबाह्य तसेच अनधिकृतपणे लावण्यात आलेले राजकीय फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग्स, चिन्ह, ध्वज, फलक, भिंतीवरील राजकीय जाहिराती आदी तत्सम बाबी तात्काळ हटविण्यात याव्यात, असे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिका प्रशासनाला दिले.
असा आहे निवडणूक कार्यक्रम…
- महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक.
- २३ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार.
- ३० ऑक्टोबरपर्यंत उमेदवार अर्जाची छाननी.
- ४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस.
- २० नोव्हेंबरला मतदान तर, २३ नोव्हेंबरला निकाल.
















