- तब्बल पंधरा नाराज नगरसेवकांकडून पक्षश्रेष्ठींना निर्वाणीचा इशारा..
- फेरविचार करण्याची केली मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑक्टोबर २०२४) :- चिंचवड विधानसभेत जगताप परिवाराच्या विरोधातला असंतोष शमण्याऐवजी वाढतच चालला आहे. एकीकडे जगताप विरोधक अजित पवार गटातील नगरसेवक एकत्र बैठका घेत आहेत. तर, भाजपाच्या गोटात कार्यपद्धतीला व घराणेशाहीला विरोध करीत लोकसभा निवडणूकीआधीच भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे, नवनाथ जगताप, माया बारणे, चंदा लोखंडे, सीमा चौघुले यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभेत ज्यांनी भाजपचे चार-चार पॅनल निवडून आणले, अशी मातब्बर नगरसेवक मंडळी आणि पदाधिकारी मंगळवारी (दि. १५) रोजी एकत्र आले. या बैठकीत या सर्वांनी जगताप कुटुंबातील घराणेशाहीला तीव्र विरोध दर्शविला आहे.
या बैठकीला माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे, संदिप कस्पटे, कैलास बारणे, सिद्धेश्वर बारणे, बाळासाहेब ओव्हाळ, माजी नगरसेविका माधुरी कुलकर्णी, सुनिता तापकीर, सविता नखाते यांसह भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राज तापकीर, राम वाकडकर आदी उपस्थित होते.
” देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि पक्षाचे आजपर्यंतचे सर्वच मोठे नेते या सर्वांनी नेहमीच एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त महत्वाची पदे देण्यास विरोध केला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने देखील घराणेशाहीला महत्व न देता एकाच कुटुंबात सर्व महत्वाची पदे वाटप न करता कार्यकर्त्यांना समान न्यायाने त्याचे वाटप करावे, अशी एकमुखी मागणी या बैठकीत भाजपचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच ‘जगताप’ सोडून आमच्यापैकी कोणालाही एकाला उमेदवारी द्या. आम्ही काम तर, करूच व त्या उमेदवाराला निवडूनही आणू, असा निर्धार या सर्वांनी बैठकीत व्यक्त केला.
”पक्षाच्या वरीष्ठांनी आम्हाला संपर्क केला आहे. परंतू, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. जर का पक्षाने आमची दखल घेतली नाही तर, आम्ही १४ ते १५ नगरसेवक वेगळी भूमिका घेऊन आमची ताकद दाखवून देऊ”.
– भाजपचे नाराज माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची भूमिका…
















