न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२४) :- राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होऊन काही दिवस लोटले तरीही, सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची अद्याप नियुक्ती झालेली नव्हती. त्यामुळे सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाच सर्व कामकाज पाहावे लागत होते. अखेरीस पुणे सारथीचे उपव्यवस्थापकीय संचालक अनिल पवार यांची चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. पुणे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी (दि. १७) केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार २२ ऑक्टोबरपासून अर्ज स्वीकृतीस सुरुवात होणार आहे. सर्व विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या यापूर्वीच नियुक्त्या झाल्या आहेत. परंतु, चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झालेले महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी दोन महिन्यांच्या वैद्यकीय रजेवर आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी अद्याप नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही.
राज्यात सर्वांत मोठा मतदारसंघ चिंचवड आहे. सहा लाख ७७ हजार ३७० मतदार, तर ५६४ मतदान केंद्र आहेत. असे असताना आचारसंहिता लागून दोन दिवस झाल्यानंतरही चिंचवडसाठी अद्याप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही.











