- विधानसभेसाठी रणशिंग अखेर फुंकलेच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑक्टोबर २०२४) :- मनोज जरांगे पाटील यांनी आज रविवारी (दि. २०) अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करायचे की नाही? यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला विचारत त्यांचं मत जाणून घेतलं. त्यानंतर मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली. ‘ज्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून येतील त्या ठिकाणी उमेदवार द्यायचे. तसेच जो मतदारसंघ राखीव असेल त्या ठिकाणी जर उमेदवार आपल्या विचाराचा असेल मग तो उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल तरीही त्या उमेदवाराला आपण मदत करायची. मग त्या ठिकाणी आपण उमेदवार उभा करायचा नाही. मात्र, त्या उमेदवाराकडून ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आपल्याला पाठिंबा देईल असं लिहून घ्यायचं’, अशी घोषणा मनोज जरांगे यांनी जाहीर केली आहे.
“आपला उमेदवार कोणत्या मतदारसंघामधून निवडून येऊ शकतो? तसेच कोणत्या मतदारसंघात मुस्लिम-दलीत एकत्र आहेत, ते देखील आपण पाहणार आहोत. मात्र, तुम्ही तोपर्यंत उमेदवारी अर्ज भरा, अर्ज मागे घ्यायच्या दिवशी मी तुम्हाला सांगेल की कोणत्या मतदारसंघामधून कोणाचा अर्ज ठेवायचा? आणि कोणाचा अर्ज मागे घ्यायचा? हे सांगेल. पण तुम्ही आता उमेदवारी अर्ज भरा. मी बरोबर समीकरण जुळवतो”, असं म्हणत मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची मोठी घोषणा केली आहे.