न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२४) :- पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट असोसिएशनची सन २०२४-२५ ची सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून माजी अध्यक्ष नारायण रसाळ यांनी काम पाहिले. तसेच विविध पदांसाठी १३ फॉर्म आल्याने निवडणूक अधिकारी यांनी सदरची निवडणूक बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा नेहरूनगर कोर्ट आवारात केली.
कमिटीच्या अध्यक्षपदी अॅड. पांडुरंग विठ्ठल शिनगारे यांची बिनविरोध निवड झाली तसेच उपाध्यक्ष म्हणून अॅड. अजय रामसुमेर यादव, सचिव म्हणून अॅड. संदिप भाऊसाहेब तापकीर, महिला सचिव अॅड. संगीता रमेश कुशलकर, सहसचिव अॅड. पदमावती लक्ष्मण पाटील, खजिनदार पदी अॅड. विशाल आसाराम पोळ, हिशोब तपासनीस पदी अॅड. प्रेरणा हरेश चंदानी, तसेच सदस्यपदी अॅड. विजय धोंडिराम भोंडे, अॅड. अक्षय कमलाकर चौधरी, अॅड. आरती दत्तात्रय कुलकर्णी, अॅड. पौर्णिमा भगवान मोहिते, अॅड. रूपाली रामचंद्र पवार, अॅड. सुषमा सुदर्शन पाटील यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी माजी अध्यक्षा अॅड. प्रमिला गाडे व कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.
वकिलांच्या विविध समस्या दूर करणे, महिला वकील वर्गाला येणाऱ्या अडचणी दूर करणे, ज्यूनिअर वकिलांना मानधन मिळवून देणे, दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व स्वरूपाच्या समस्यांचे निवारण करणे, मोशी येथील न्यायालयीन जागेत सुरू असलेल्या बांधकाम लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याकरिता प्रयत्न, मंजूर असलेले दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व सत्र न्यायालय लवकरात लवकर चालू करणे कामी पाठपुरावा करणे, अशी सर्व कामे करण्याचे आश्वासन नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. शिनगारे यांनी दिले आहे.












