- महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२४) :- महापालिकेच्या अत्यावश्यक विभागासह सर्वच विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभेच्या निवडणूक कामकाजासाठी नेमण्यात आले आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसल्याने महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. महापालिकेच्या अत्यावश्यक विभागातील कर्मचाऱ्यांना तरी निवडणूक कामकाजातून वगळावे, अशी विनंती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता मंगळवारपासून (दि. १५) लागू झाली आहे. शहरात तीन विधानसभा क्षेत्र आहेत. त्या मतदारसंघाच्या निवडणूक कामकाजासाठी विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्या पथकांना वाहने दिले जातात. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची वाहने निवडणूक विभागाकडून ताब्यात घेण्यात येत आहेत. मुदतीमध्ये संबंधित वाहने महापालिकेने निवडणूक विभागाकडे जमा न केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
निवडणूक कामकाजासाठी महापालिकेच्या बहुतांश विभागाच्या अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यातून अत्यावश्यक सेवेतील पाणीपुरवठा, अग्निशमन, ड्रेनेज, आरोग्य, विद्युत या विभागांतील अधिकारी कर्मचारीही आहेत. नेमलेल्या मतदार संघाच्या कामासाठी हजर न झाल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. सर्वच अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामकाजात व्यस्त असल्याने महापालिका व क्षेत्रीय कार्यालये ओस पडली आहेत. विधानसभानिहाय निवडणूक कामकाजासाठी विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्या पथकांना वाहने दिले जातात. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची वाहने निवडणूक विभागाकडून ताब्यात घेण्यात येत आहेत.












