- इकडे पक्ष कोणताही असो काटे-कलाटे-भोंडवेमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२४) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा वाढत चालला आहे. या जागेवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने तयारी चालवली असतानाच आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने घटक पक्षांवर कुरघोडी करणे सुरु केले आहे. शरद पवार गटाने उमेदवार आयात करण्याची चाल आखली आहे, तर उद्धवसेनेने माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांना पक्षप्रवेश देत काटशह दिला आहे. त्यामुळे चिंचवडच्या तिकिटाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर बदलाच्या वाऱ्याचा अंदाज घेत महाविकास आघाडीतील शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटात जोरदार ‘इनकमिंग” सुरू आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघ ‘मविआ’तील कोणत्या पक्षाला सुटणार, याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचे नेते नाना काटे आणि अजित पवार गटासह शिंदेसेनेशीही जवळीक असलेले राहुल कलाटे यांनी शरद पवार गटाशी घरोबा करण्याचे ठरवले आहे. महायुतीत अजित पवार गटाला ही जागा मिळणार नसल्याने आणि ‘मविआ’तील शरद पवार गटाचा दावा प्रबळ असल्यानेच दोघांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. या दोघांची रस्सीखेच सुरू असून, आणखी काही माजी नगरसेवकांनीही ‘तुतारी तील इच्छुकांच्या रांगेत थांबणे पसंत केले आहे. ‘तुतारी’कडे तगड़ा उमेदवार नसल्याने आयातीवर भिस्त ठेवावी लागणार आहे. त्यामुळे काटे-कलाटे यांची नावे दावेदार म्हणून पुढे आली.
या दरम्यान उद्धवसेनेनेही तयारी सुरू केली होती. अजित पवार गटाच्या काही माजी नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतली होती, त्यात मोरेश्वर भोंडवे हेही होते. त्याच भोंडवे यांनी शुक्रवारी उद्धवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे चिंचवडची जागा उद्धवसेनेला सुटणार, की शरद पवार गटाला जाणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. भोंडवे यांनी २०१४ ला अपक्ष म्हणून निवडणूक लढवत दहा हजार मते खाल्ली होती.
चिंचवडच्या २०२३ मधील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राहुल कलाटेंसाठी अतोनात प्रयत्न केले होते. मात्र, कलाटेंना राष्ट्रवादीचे तिकीट मिळाले नाही. ते अपक्ष म्हणून थांबले. तेव्हा राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या नाना काटेंच्या प्रचारासाठी डॉ. कोल्हे फिरकलेही नाहीत. उलट त्यांनी कलाटेंचे चिन्ह असलेल्या शिटी’चा छुपा प्रचार केल्याची उघड चर्चा होती. आताही डॉ. कोल्हे यांनी शरद पवार गटात कलाटेंचा प्रवेश व्हावा आणि त्यांनाच तिकीट द्यावे यासाठी ‘फिल्डिंग लावल्याचे दिसले. चिंचवडच्या पोटनिवडणुकीत जगताप-कलाटे- काटे अशी तिरंगी लढत झाली होती. कलाटे यांचे मतविभाजन झाल्याने जगतापांचा विजय सुकर झाला होता. कलाटे यांच्यामुळेच आपण पडलो, अशी सल काटे खासगीत बोलून दाखवतात, तर माझ्या वाटेत काटेंनी काटे पसरले नसते, तर मी जगतापांचा पराभव करू शकलो असतो, असे कलाटे सांगतात. आताही ते दोघे एकमेकांच्या मार्गातील अडसर बनले आहेत.
नाना काटे यांची राजकीय वाटचाल अजित पवारांचे बोट धरून झाली आहे. त्यामुळे त्यांनी सोबत सोडलेली नाही. दहा वर्षात दोनदा झगडूनही काटेंना विधानसभेत प्रवेश करता आलेला नाही. यादरम्यान पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवकही नसलेल्या अमित गोरखे यांना भाजपने विधान परिषदेवर पाठवले. मात्र, महापालिकेत अजित पवार गटाचा किल्ला सांभाळूनही आणि दोनदा विधानसभा लढवूनही अजित पवारांनी विधान परिषदेवर संधी न दिल्याने काटे दुखावले आहेत. त्यातच भाजपसोबत जावे लागत असल्याने महायुतीच्या तिकिटाची संधी हुकली आहे. आता भाजपच्या कमळाचा प्रचार केल्यानंतर पुढे महापालिकेवेळी राष्ट्रवादीच्या घड्याळाचा प्रचार कसा करायचा, असाही पेच त्यांच्यापुढे आहे. या दुखण्यामुळेच ते ‘तुतारी’ हाती घेण्याच्या तयारीत आहेत. मात्र, जागावाटपाचा संभ्रम वाढल्याने त्यांचे दुखणे बळावले आहे.












