- पाच परप्रांतीय कामगारांचा नाहक मृत्यू..
- ठेकेदाराची पोलिसांकडून उचलबांगडी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑक्टोबर २०२४) :- भोसरीतील सद्गुरुनगर येथे पाण्याची टाकी अंगावर कोसळुन पाच कामगारांचा गुरुवारी (दि. २४) रोजी सकाळी ०६.३० वा. चे सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला. हा प्रकार लेबर कॅम्प, हनुमान कॉलनी, सदगुरुनगर, भोसरी येथे घडला.
यात १) नवीन जोन्ना २) माल्ला महाकुर ३) सोनु कुमार ४) रविंद्र कुमार ५) सुदाम बेहरा (सर्व रा. लेबर कॅम्प, भोसरी) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच या दुर्घटनेत इतर ६ मजुर जखमी झालेले आहेत.
मजुर कॅम्पाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असणाऱ्या संस्थेने पाण्याच्या टाकीचे निकृष्ट व कच्चे बांधकाम केले. त्यांच्या बेपरवाई व हलगर्जीपणामुळे ५ कामगारांच्या मृत्युस ते कारणीभुत झाले आहेत. याप्रकरणी संतोषकुमार रामनरेश सहानी (वय ३५, व्यवसाय मजदूर) यांनी श्री विनायक इंडस्ट्रीयल सर्व्हिसेसचे कुमार भारत लोमटे याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. या तक्रारीवरून भोसरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ६५९/२०२४ बीएनएस कलम- १०५, १२५ (ए), १२५ (बी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपी पोलीसांच्या ताब्यात असुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालु आहे. . घटनास्थळी पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त व इतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम कंपनी NCCL मार्फत लांडेवाडी भोसरी या ठिकाणी बांधकामाची साईट चालू आहे. साईटवर काम करणाऱ्या मंजुरांच्या निवास व्यवस्थेसाठी सदगुरुनगर येथे कंपनी मार्फत लेबर कॅम्प उभारण्यात आला आहे. सद्यस्थितीत या कॅम्पमध्ये ३५० कामगार वास्तव्यास असुन त्यांच्या निवासासाठी तात्पुरत्या स्वरुपात खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. मजुरांच्या राहाण्याची व इतर व्यवस्था करण्याची जबाबदारी श्री विनायक इंडस्ट्रीअल सर्व्हिसेस या कंपनीला देण्यात आली आहे. कुमार भारत लोमटे हे या कंपनीचे मालक आहेत. लेबर कॅम्पची उभारणी त्यांनी केली. सुमारे अडीच महिन्यापासुन ते कॅम्पचे व्यवस्थापन करीत आहेत. मंजुरांना वापराचे पाणी कमी पडत असल्यामुळे त्यांनी जमीनीवरती नवीन टाकीचे बांधकाम केले होते. बांधकाम हे दोन दिवसापुर्वी पुर्ण झाले होते. सकाळी टाकीमध्ये पुर्ण क्षमतेने पाणी भरल्यावर टाकी फुटली. बाजुला अंघोळीसाठी जमलेल्या मजुरांवर ही टाकी कोसळली. त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे.