- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या हाती मोठ ‘घबाड’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑक्टोबर २०२४) :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत पुण्यातील सहकारनगर भागातून तब्बल १२८ कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोने कोठे नेण्यात येत होते. यादृष्टीने तपास सुरू आहे.
नाकाबंदीत सहकारनगर पोलिसांनी शुक्रवारी १२८ कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. याबाबतची माहिती निवडणूक अधिकारी आणि प्राप्तिकर विभागाला कळविण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.
सहकारनगर भागात शुक्रवारी सकाळी एका टेम्पो चालकाला नाकाबंदीत पोलिसांनी अडवले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली. तेव्हा वाहनात मोठ्या प्रमाणावर साेने असल्याचे आढळून आले. नाकाबंदीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती त्वरीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली. पोलिसांनी सोने, तसेच टेम्पो जप्त केला आहे. कोट्यवधी रुपयांचे सोने कोठून आणले, तसेच ते कोणाला देण्यात येणार होते, यादृष्टीने तपास सुरू आहे. टेम्पो एका वाहतूकदाराचा असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर परिसरात ग्रामीण पोलिसांनी एका मोटारीतून पाच कोटी रुपयांची जप्त केली होती. मावळ तालुक्यात पावणे अठरा लाखांची रोकड जप्त केली होती.