- पक्षश्रेष्ठींसमोर सोमवारपर्यंत समजूत काढण्याचे आव्हान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२४) :- पिंपरी, चिंचवड, भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे नेत्यांची डोकेदुखी वाढली असून, त्यांच्यापुढे अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे सोमवारपर्यंत (दि. ४) बंडखोरांची समजूत काढण्याचे आव्हान आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत मंगळवारपर्यंत होती. दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये धावपळ सुरू होती. त्यानंतर चारही मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीत बंडाचे निशाण रोवल्याचे स्पष्ट झाले. सोमवार, दि. ४ नोव्हेंबर अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. आजपर्यंत दाखल झालेल्या अर्जामधून लढतीचे चित्र समोर आले आहे. भोसरीमध्ये तिरंगी, पिंपरीत बहुरंगी, चिंचवडला चौरंगी आणि मावळमध्ये दुरंगी लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.
अर्ज माघारीसाठी ४ नोव्हेंबरची मुदत आहे. त्यानंतर चार मतदारसंघांतील लढत कशी असेल?, हे स्पष्ट होणार आहे. तीन मतदारसंघांमध्ये बंडखोरीचे प्रमाण आहे. बंडोबांना थंड करण्याचे आव्हान महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर आहे.
पिपरीमध्ये महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे उमेदवार असून, भाजपचे माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, आरपीआय आठवले गटाच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी बंडखोरी केली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीच्या सुलक्षणा शीलवंत धर यांनी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबूकस्वार, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले यांचीही अपक्ष उमेदवारी आहे. त्यामुळे येथे बहुरंगी लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.
भोसरीमध्ये महायुतीकडून विद्यमान आमदार महेश लांडगे आणि महाविकास आघाडीकडून अजित गव्हाणे रिंगणात आहेत. त्याचबरोबर उद्धवसेनेचे रवी लांडगे यांनीही अर्ज दाखल केला आहे. येथे सध्या तिरंगी लढत दिसत आहे.
चिंचवडमध्ये महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी अर्ज दाखल केला असून, महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बंडखोर उमेदवार नाना काटे, भाऊसाहेब भोईर यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी असल्याने चौरंगी लढत दिसत आहे.