न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२४) :- विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळ मतदारसंघातून अखेरच्या दिवसापर्यंत १२२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बुधवारपासून अर्ज छाननीला सुरुवात होणार असून, सोमवारपर्यंत (दि. ४ नोव्हेंबर) उमेदवारांना अर्ज माघारी घेता येणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला १५ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. जागा वाटपापासून ते बंडखोरी रोखण्यापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीसमोर आव्हान होते. अखेरच्या दिवसापर्यंत काही जागांवर उमेदवार देताना महायुती आणि महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेतृत्वाची दमछाक झाली. मंगळवारी अखेरच्या दिवशी अर्ज दाखल केल्यानंतर एबी फॉर्म मिळालेल्या इच्छुकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
मंगळवारी भोसरी विधानसभा निवडणूक कार्यालयात विविध पक्षांचे उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. ते वेळेत पोहोचले होते. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे काही जणांना ताटकळत बसावे लागले, त्यामुळे त्यांनी निवडणूक कामकाजावर नाराजीही व्यक्त केली.
पिपरीतून अखेरच्या दिवशी ३० जणांचे ३३ अर्ज, तर अखेरच्या मुदतीपर्यंत एकूण ३९ उमेदवारांनी ४५ अर्ज दाखल केले. मावळमधून मंगळवारी ८ उमेदवारांनी ८ अर्ज दाखल केले. एकूण १८ उमेदवारांनी २६ अर्ज दाखल केले आहेत. चिंचवडमधून अखेरच्या दिवशी १९ उमेदवारांनी २६ अर्ज, तर एकूण ३२ उमेदवारांनी ४४ अर्ज दाखल केले आहेत. भोसरीतून एकूण ३३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी २३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
यांनी साधला मुहूर्त…
मंगळवारी चिंचवडमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राहुल कलाटे यांनी तर, पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीकडून भाऊसाहेब भोईर तर संदीप चिंचवडे यांनी अपक्ष म्हणून, मारुती भापकर यांनी महाराष्ट्र स्वराज पक्षाकडून अर्ज दाखल केला. पिपरीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुलक्षणा शिलवंत, वंचित बहुजन आघाडीतून मनोज गरबडे यांनी आणि गौतम चाबुकस्वार, काळुराम पवार यांनी अपक्ष म्हणून, तर बाळासाहेब ओव्हाळ यांनी तिसऱ्या आघाडीकडून अर्ज दाखल केला. भोसरीतून भाजपच्या वतीने महेश लांडगे तर शिवसेना उद्धव ठाकरे गटातून बंडखोरी करत रवी लांडगे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे.