- पवार, देशमुख, बांगर आणि रणदिवे गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मोका ‘अंतर्गत कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२४) :- शहरात निवडणुकीची धामधूम सुरू असताना पोलिसांनी गुन्हेगारांना मोठा झटका दिला आहे. शहर परिसरातील विष्णू पवार टोळी, राजू देशमुख टोळी, बाळासाहेब बांगर टोळी, सूरज रणदिवे टोळी या चार गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मोका ‘अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुन्हेगारी टोळ्यांना दणका दिला. तसेच प्रतिबंध कारवाईचा आराखडा तयार केला असून, २०२४ मध्ये दहा महिन्यांत पोलिस आयुक्तालय हद्दीतील ३० संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील १७५ गुन्हेगारांवर ‘मोका’ कायद्यांतर्गत कारवाई झाली.
हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टोळी प्रमुख विष्णू दिगंबर पवार (रा. वडगाव मावळ), करण राहुल लोखंडे (१९, रा. काळाखडक, वाकड) व इतर चौघांवर नऊ गुन्ह्यांची नोंद आहे. सांगवी हद्दीतील टोळी प्रमुख राजू बापुराव देशमुख (२१), शेखर संपत देशमुख (२६), स्वप्नील वाल्मीकी कांबळे (२०), हनुमान टिपन्ना राठोड (२१), विनोद वाल्मीक कांबळे (२०, सर्व रा. बाणेर), दत्ता दादा कांबळे (२३, रा. पाषाण) या टोळीवर नऊ गुन्ह्यांची नोंद आहे. एमआयडीसी भोसरी हद्दीतील टोळी प्रमुख बाळासाहेब बळीराम बांगर (२९, रा. चाकण), प्रवीण दत्तात्रय भालेराव (२८, रा. आणदेशे, ता. मावळ), अशोक गणेश शिरोळे (२५, रा. मोशी) यांच्या टोळीवर नऊ गुन्हे आहेत. एमआयडीसी भोसरी हद्दीतील टोळी प्रमुख सुरज प्रकाश रणदिवे (रा. घरकुल, चिखली), विवेक विनोद नाईक ऊर्फ सोन्या (२०), सौरभ कानिफनाथ भोपळे (२०), अथर्व उदय पकाले (२०, तिघे रा. खंडे वस्ती, भोसरी), प्रतीक ज्ञानेश्वर सपकाळ (२८, रा. वाकड), लकोऊर्फ लखन ऊर्फ सुनील रामभाऊ पवार (२४, रा. काळाखडक, वाकड), चेप्या ऊर्फ केतन गणेश सोनवणे (२६, रा. मिलींदनगर, पिंपरी) व इतर नऊ यांच्या टोळीवर चार गुन्हे आहेत.
चारही टोळ्यांनी हिंजवडी, तळेगाव दाभाडे, वाकड, चिखली, चाकण, एमआयडीसी भोसरी, चिंचवड, निगडी, सांगवी, चतुश्रृंगी, दत्तवाडी, कोथरुड, वडगाव मावळ, पौड, घोडेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे केल्याची नोंद आहे.
गुन्हेगारी टोळ्यांवर वॉच…
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हेगारी टोळ्यांवर वॉच ठेवण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार, या चारही टोळ्यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) १९९९ अतंर्गत कारवाईबाबत प्रस्ताव सादर झाला आहे. अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांनी आदेश पारीत केला आहे.