- पक्षादेश मोडत अपक्ष उमेदवाराला दिला पाठींबा..
- पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे दोन्ही माजी नगरसेवकांवर कारवाई करणार?..
- शिवसैनिकांमध्ये कुजबूज सुरु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ नोव्हेंबर २०२४) :- चिंचवड येथील शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख आणि माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांनी अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
नुकतेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी देखील पक्षाचा आदेश धुडकावत महायुतीचे भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांना पाठिंबा दर्शविला होता आणि पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती कोऱ्हाळे यांनी केली आहे.
त्यामुळे शिवसेना ठाकरे गटात नेमकं चाललंय काय? पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी या दोन्ही माजी नगरसेवकांवर कारवाई करणार काय? अशी कुजबुज शिवसैनिकांमध्ये सुरु आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा व सुमारे पावणेसात लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात भाऊसाहेब भोईर यांनी ताकद लावली आहे. तीन दशकांहून अधिक राजकीय अनुभव आणि जनसंपर्क याच्या जोरावर ते निवडणुकीत उतरले आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.
कोऱ्हाळे म्हणाले की, भाऊसाहेब भोईर माझे राजकीय जीवनातील गुरू आहेत. एका तपापासून माझ्या पाठीशी उभे आहेत. मी जरी शिवसेनेचा असलो तरी मी माझा व्यक्तिगत निर्णय घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. मी चिंचवडचा असल्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबीयांना तसेच चिंचवडवासीयांना वाटते की आपल्या चिंचवडचा आमदार झाला पाहिजे.
















