न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ नोव्हेंबर २०२४) :- भोसरी विधानसभा मतदारसंघ निवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी रविवारी (दि.१०) पुर्णानगर चिखली येथील महापालिकेच्या बहुउद्देशीय सभागृह, सेक्टर क्र. १८ येथे पार पडली. त्रुटीनुसार काही खर्च बँक खात्यातून न केल्याबद्दल ९ जणांना नोटीस दिली असून याबाबत खुलासा सादर करण्याबाबत कळविले आहे. तसेच एका उमेदवाराला त्यांच्या स्वतःच्या वाहनावरील इंधनाच्या खर्चाबाबत दैनंदिन नोंद दर्शविण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.
निवडणूक खर्च निरीक्षक प्रेम प्रकाश मीना यांच्या उपस्थितीत, निवडणूक खर्च तपासणी प्रमुख मलप्पा वाघमारे वैजिनाथ आव्हाड, मनोज हिंगे व सहाय्यक खर्च निरीक्षक राजेशकुमार कुशवाहा यांच्या अधिपत्याखाली उमेदवारांनी केलेल्या दैनंदिन खर्चाची तपासणी प्रक्रिया पार पडली.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराच्या प्रचार खर्चाची मर्यादा ४० लाख रूपये आहे. भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये एकूण ११ उमेदवार निवडणूक लढवत असून त्यांचे दररोजच्या खर्चाचे लेखे व खर्चाच्या पावत्या या लेखांकन पथकाकडे जमा केल्या जातात. त्याचवेळी रजिस्टरमध्ये उमेदवाराचा रोजचा प्रचार खर्च नोंदवला जातो.
भारत निवडणूक आयोग कार्यालयाकडील निवडणूक खर्च संनियंत्रण संदर्भातील तरतूदीनुसार उमेदवारांनी केलेल्या दैनंदिन खर्चाची तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी तीन टप्प्यांत करण्याचे नियोजन आहे. उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची दुसरी तपासणी १४ नोव्हेंबरला तर तिसरी तपासणी १९ नोव्हेंबरला सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांनी दिली.
उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे करण्यात आली असून निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे उमेदवारांनी सादर केलेला खर्च तपासला जात आहे. पुढील तपासणीसाठी विहित वेळेत खर्चाचा तपशील सादर करावा, अशी सूचना देखील निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांनी सर्व उमेदवारांना दिली आहे.
















