- प्रवेशद्वारासमोरच सूचनेचा प्रशासनाने लावलाय फलक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ नोव्हेंबर २०२४) :- पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील सर्व अधिकारी तसेच कर्मचारी यांना दुचाकी वापरताना हेल्मेट परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा महापालिकेत प्रवेश दिला जाणार नाही, असा आदेश प्रशासनाने काढला आहे. नियमाचे उल्लंघन करणा-या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
यासंदर्भात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यापूर्वीच पिंपरी-चिंचवड महापालिकेला निर्देश दिले आहेत, हेल्मेटचा वापर न करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर संबंधित कार्यालय प्रमुखांनी शिस्तभंगाची तसेच दंड वसुलीची कार्यवाही करावी. त्याचबरोबर याची नोंद मूळ सेवापुस्तकात घ्यावी, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली असून महापालिकेच्या प्रवेशद्वारावर अधिकारी व कर्मचारी यांच्या आकलनासाठी यासंदर्भात बोर्ड लावण्यात आला आहे. महापालिकेत प्रवेश करताना आणि बाहेर पडताना दुचाकीचालक अधिकारी, कर्मचारी यांनी हेल्मेट सक्तीने परिधान करावे, अन्यथा प्रवेश दिला जाणार नाही, असे बोर्डवर नमूद करण्यात आले आहे.
















