- दिशाभूल करणाऱ्या माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२४) :- ”मतदार यादीतून जर तुमचे नाव डिलीट झाले असेल किंवा नावापुढे डिलिटेड असा शिक्का मारला असेल तर १७ क्रमांकाचा फॉर्म भरून मतदान करू शकता”, अशा आशयाचा मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. परंतु, अशा प्रकारच्या मेसेजमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे निवडणूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मतदार यादीत नाव नसल्यास निवडणुकीच्या दिवशी मतदान करता येत नाही, हाच नियम लागू आहे. मतदान यादीत नाव नसल्यास नमुना क्र. १७ चा अर्ज भरून आणि आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार असल्याचा दिशाभूल करणारा संदेश व्हॉट्मपवर तसेच समाज माध्यमांवर पसरविला जात असल्याचे निदर्शनास आले असून अशा संदेशांपासून मतदारांनी सावध रहावे, अफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच असे संदेश पुढे पाठवू नयेत, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे.
फॉर्म क्र. १७ हा दहावी बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी असतो. तर मतदारयादी मध्ये नाव नोंदणीसाठी फॉर्म क्र. ६ असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही फॉर्मद्वारे मतदान केंद्रावर जावून मतदान करता येत नाही. तरी, अशा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, अशी चुकीची माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
















