न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२४) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार अशा एकूण ७७ मतदारांनी अर्ज क्रमांक १२ डी भरुन गृह मतदानासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ७४ मतदारांनी गृह मतदान केले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी गृह मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिली आहे. त्याअनुषंगाने ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करु शकत नाहीत त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे पवार यांनी सांगितले. या सुविधेसाठी एकूण ७७ जणांनी अर्ज भरुन मागणी केली होती.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात गृह मतदानाची प्रक्रिया राबविण्यात आली. टपाली मतदान कक्षाचे समन्वय अधिकारी अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या विशेष पथकाद्वारे ही प्रक्रिया पार पडली. या पथकामध्ये मतदान अधिकारी १, मतदान अधिकारी २, सूक्ष्म निरीक्षक, पोलीस कर्मचारी व व्हिडीओग्राफर यांचा समावेश होता. टपाली मतदान कक्षाचे प्रशासन अधिकारी गोरखनाथ लिमण यांनी या पथकासोबत समन्वय ठेवून गृह मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
















