- तर, एका परवाना निरीक्षकाचे सेवानिलंबन?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२४) :- पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना जाहिरात होर्डिंग लावल्याने जाहिरात एजन्सीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, पोलिसात तक्रार न दिल्याबद्दल एका परवाना निरीक्षकाचे सेवानिलंबन करण्यात आले आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघात व्यावसायिक जाहिरातीच्या होर्डिंगवर प्रश्नार्थक जाहिराती लावण्यात आल्या होत्या. त्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्यात आले होते. जाहिरात लावणाऱ्यांची नावे जाहिरातीवर नव्हते. त्यामुळे ती जाहिरात कोणी लावली हे आढळून आलेले नाही. त्यामुळे उमेदवाराची नाहक बदनामी झाली.
त्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे सामाजिक कार्यकर्ते सरदार रवींद्र सिंह यांनी तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, आकाशचिन्ह विभागाच्या दोन परवाना निरीक्षकांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेच्या परवानाधारक चार एजन्सींवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाहिरात कोणी लावली याचा शोध घेण्यात येत आहे. तसेच, पोलिसात गुन्हा दाखल न करणाऱ्या परवाना निरीक्षक किशोर गावडे यांचे सेवानिलंबन करून विभागीय चौकशी कारवाईची शिफारस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
















