- पिंपरी मतदारसंघात अनोखी मतदान जनजागृती..
- ३ हजारांहून अधिक पाहूण्यांनी घेतली मतदानाची शपथ….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२४) :- लग्न सोहळयापूर्वी वधु-वरांनी हातात धरलेले मतदान जनजागृतीचे फ्लेक्स, वधु-वर मातापित्यांनी २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत आपण सर्वांनी मतदान करावा या आशयाचा हातात घेतलेला मतदानाचा बॅनर, स्वीप नोडल अधिका-यांनी केले मतदानाच्या शपथेचे वाचन आणि मंचावर तसेच लॉनवर उपस्थित नातेवाईक व ३ हजारांहून अधिक पाहुण्यांनी घेतली मतदानाची शपथ असा अनोखा मतदान जनजागृतीचा सोहळा काल पिंपरी चिंचवड शहरात संपन्न झाला.
विवाह हा जीवनातील महत्त्वाचा प्रसंग असतो. सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा हा प्रसंग सर्वांच्याच कायम संस्मरणात रहावा त्यातून समाजप्रबोधनही व्हावे, राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले जावे या सामाजिक बांधिलकीतून या अनोख्या मतदान जनजागृतीचे आयोजन मंगल परिणय सोहळयात करण्यात आले होते. रहाटणी येथील गौरी कांबळे व चिंचवड येथील मनोज जगताप या वधुवरांच्या मंगल परिणयानिमित्त आयोजित सोहळ्यात २०६, पिंपरी विधानसभा कार्यालयाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांचे मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमास बहुजन बहुउद्देशीय विकास संस्थेचे सहकार्य लाभले.
यावेळी उपस्थितांनी “आम्ही भारतीय नागरीक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु” अशी शपथ घेऊन मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला. स्वीप नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी २० नोव्हेंबर रोजी होणा-या मतदानाविषयी माहिती देऊन मतदान शपथेचे वाचन केले तसेच सक्षम लोकशाहीसाठी मतदारांनी निवडणूकीमध्ये मतदान करणे आवश्यक असून त्याकरिता सर्वांनी मतदान करावे असे आवाहन केले.
या विवाह सोहळयात प्रवेशद्वारापासून सर्वत्र मतदान जनजागृतीचे फ्लेक्स लावण्यात आलेले होते. याशिवाय बहुजन बहुउद्देशीय विकास संस्थेच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली संविधानातून मतदानाचे अधिकार याबाबत जनजागृतीपर संदेश फलकही लावण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे नियोजन बहुजन बहुउद्देश्य विकास संस्थेचे पदाधिकारी प्रदीप पवार, रमेश जाधव, मिलिंद जाधव, प्रमोद गायकवाड, आशाताई बैसाणे व विजय कांबळे यांच्या वतीने करण्यात आले. या सोहळयास अरुण चाबुकस्वार, विलास कांबळे, हरीश गायकवाड, राजेंद्र भोसले, सारंग नाईक, विक्रम खंडागळे, अनिता इंगळे, वीणा कांबळे, दोडके, बेंद्रे, दिनेश गायकवाड, अमोल पारखी, दिलीप चव्हाण तसेच स्वीप विभागाचे महालिंग मुळे उपस्थित होते.
जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांचे मार्गदर्शनाखाली २०६, पिंपरी विधानसभा कार्यक्षेत्रात व्यापक प्रमाणात मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून त्यास नागरीकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये या दृष्टीकोनातून विविध उपक्रमाद्वारे मतदान जनजागृती करण्यात येत असून नागरीकांनी निवडणूक प्रक्रीयेत सहभागी व्हावे व मतदानाचा हक्क बजवावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.
– अर्चना यादव, निवडणूक निर्णय अधिकारी…
















