- बिर्ला रुग्णालयावर कारवाई करा, अन्यथा लेडीज बार असे नामकरण केले जाईल; युवराज दाखले यांचा इशारा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०१९) :- ‘नर्सिंग डे’ च्या नावाखाली आदित्य बिर्ला रुग्णालयामध्ये धांगड-धिंगा करणाऱ्या व्यवस्थापनावर तसेच रुग्णालयावर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, वास्तविक पाहता आदित्य बिर्ला रुग्णालयाचा सर्वसामान्य जनतेला उपचारासाठी वेठीस धरण्याचा पराक्रम वेळोवेळी समोर आला आहे. परंतु, गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा फरक पडलेला दिसुन येत नाही.
‘नर्सिंग डे’ च्या कार्यक्रमासाठी एखादा हॉल घेणे गरजेचे होते. परंतू, तसे न करता रुग्णालयामध्येच त्यांनी तब्बल दोन तास नाचगाण्याचा कार्यक्रम घेऊन धिंगाना केल्याने रुग्णांच्या व नातेवाईकांच्या भावनेला ठेच पोहचवण्याचे काम बिर्ला रुग्णालयाच्या प्रशासनाने केले आहे. त्यामुळे रुग्णांच्या जीवितेशी खेळ खेळला गेला आहे.
येत्या २१ दिवसाच्या आत शासनाकडून बिर्ला रुग्णालयावर कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईल वापरून, रुग्णालयाचे लेडीज बार, असे नामकरण करण्यात येईल, असे दाखले यांनी या पत्रात म्हटले आहे.











