न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०१९) :- येत्या २३ मे रोजी लोकसभेच्या निकालाची सर्वांनाच प्रतीक्षा असली तरी, अंतिम निकाल जाहीर होण्यास सायंकाळ होणार आहे. यावेळी पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट मशीनमधल्या स्लिप्सची ईव्हीएमच्या मतांसोबत पडताळणी होणार आहे.
यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास उशीर होणार आहे. संपूर्ण राज्यात बहुचर्चित असणाऱ्या शिरूर व मावळ लोकसभा मतदारसंघात प्रत्येक सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक विधानसभेच्या पाच व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी होणार असल्याने दोन्ही लोकसभा मतदारसंघातील प्रत्येकी ३० व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी होणार आहे. ईव्हीएम मशीनवर मतमोजणी संपल्यानंतर ही पडताळणी करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे ईव्हीएम मशीनची मोजणी संपल्यानंतर ही पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामुळे, निकाल स्पष्ट झालेला असला तरी, निवडणूक विभागाला अधिकृत निकाल जाहीर करण्यासाठी वेळ लागणार आहे. एका मशीनची पडताळणी करण्यासाठी किमान पाऊण तासाचा वेळ लागणार आहे. त्यामुळे, चित्र स्पष्ठ झाल्यानंतर किमान पाच तासांनंतर अधिकृत निकाल हातात पडणार आहे.











