न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हेंबर २०२४) :- पुढील आठवड्यात मंगळवारी (दि. २६) कार्तिकी एकादशी असून आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा देखील आहे. या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र देहु येथे येणाऱ्या भाविकांची सुरक्षितता, सोयीसुविधा आणि नियोजनासाठी सोमवारी (दि. १८) मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत कार्यालयामध्ये नियोजन आढावा बैठक पार पडली.
बैठकीला श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, अभियंता संघपाल गायकवाड, शहर समन्वयक अक्षय रोकडे, नगररचना प्रमुख सुरेंद्र आंधळे, कर संकलन अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर खणसे, वैद्यकीय अधिकारी किशोर यादव, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर थोरात उपस्थित होते.
कार्तिक एकादशीनिमित्त पुण्यनगरी देहूत श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शनार्थ राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांचे आगमन होत असते. भाविकांची सुरक्षितता आणि सोयीसुविधाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीच्या वतीने विविध उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
इंद्रायणी नदीचा घाट परिसर, गावातील अंर्तगत रस्ते स्वच्छता, मंदिर परिसर स्वच्छ करणे, बंद पथदिवे सुरू करणे, महावितरणकडून विविध कामे पूर्ण करणे, मंदिर परिसरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना, दर्शनार्थ भाविकांची सुयोग्य व्यवस्था करणे, मुक्कामी दिंड्यांना सोयीसुविधा, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने औषधंसाठा उपलब्ध करणे, बाह्यरुग्ण तपासणी केंद्र उभारणे, वाहतूक कोंडी होऊ नये, वाहनतळ, बस थांबा, वाहतूक व्यवस्था नियोजन करणे आदी सूचना देण्यात आल्या आहेत.

















