- गेल्या वेळच्या तुलनेमध्ये यंदा मतदानाची टक्केवारी अल्पशी वाढली..
- शनिवारी कोण उधळणार विजयाचा गुलाल?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हेंबर २०२४) :- पिंपरी-चिंचवड शहरातील तीन मतदारसंघांनी बुधवारी आपला कारभारी ठरवला. चारही मतदारसंघांत चुरशीने मतदान झाले. चिंचवड विधानसभा मतदारसंघात ५८.३९ टक्के तर पिंपरी विधानसभा मतदारसंघात ५१.२९ टक्के आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात ६१.१४ टक्के इतके मतदान झाले आहे. गेल्या वेळच्या तुलनेमध्ये यंदा मतदानाची टक्केवारी अल्पशी वाढली आहे. निवडणूक आयोगाने मतदार जागृतीवर भर दिल्याने मतदानाचा उत्साह दिसून आला. शनिवारी (दि. २३) रोजी मतमोजणी होणार आहे.

पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी परिसरात पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि शेजारी मावळ असे चार मतदारसंघ आहेत. चारही मतदारसंघांची एकूण मतदारसंख्या २० लाख ४१ हजार ८६७ आहे. गेल्यावेळेच्या तुलनेत यंदा मतदारही वाढले आहेत.
निवडणुकीसाठी पिंपरी राखीव मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन गटांत सामना झाला. अजित पवार गटाच्या अण्णा बनसोडे यांना शरद पवार गटाच्या सुलक्षणा शीलवंत-धर यांनी आव्हान दिले होते. चिंचवडमध्ये महायुतीतील भाजपचे शंकर जगताप आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राहुल कलाटे आमनेसामने होते. अपक्ष भाऊसाहेब भोईर यांच्यामुळे रंगत वाढली होती. भोसरीत भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यापुढे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अजित गव्हाणेउभे ठाकले होते. मावळमध्ये अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके आणि अपक्ष बापूसाहेब भेगडे यांच्यात लढत झाली. बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदान झाले. सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले.
चारही मतदारसंघांमध्ये सकाळी अकरापर्यंत मतदारांचा उत्साह होता. दुपारी बारा ते तीनपर्यंत गर्दी कमी होती. चारनंतर सहापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. यंदा मतदान केंद्रांवर दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर हरित आणि गुलाबी मतदान केंद्रे लक्षवेधी होती. प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर सेल्फी पॉइंट निर्माण केल्याने, स्वतःची छायाचित्रे टिपण्यात मतदार आणि कुटुंबीय उत्सुक असल्याचे दिसून आले.
शुक्रवारी जाहीर प्रचार संपल्यानंतर उमेदवारांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या. भोसरीतील महायुतीचे कार्यकर्ते भगव्या टोप्या आणि कपडे परिधान करून बूथवर हजर होते. सांगवी परिसरात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रतिमा असणारे बिल्ले लावून कार्यकर्ते फिरत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी ‘रामकृष्ण हरी’ लिहिलेल्या गांधी टोप्या परिधान केल्या होत्या. पिंपरीत अजित पवार गटाचे कार्यकर्ते हातातील घड्याळ दाखवत होते.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. वाहतुकीचे नियोजन केले होते. मतदान केंद्रांवरील हालचालींवर सीसीटीव्हीचे लक्ष होते. दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांकरिता घरून मतदानाच्या ठिकाणी व पुन्हा त्यांच्या घरी सोडण्यासाठी रिक्षांची व्यवस्था होती. केंद्रांवर दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी व्हीलचेअरने ने-आण करण्यासाठी स्वयंसेवक होते. मतदान केंद्रांवर रॅम्प, अंध मतदारांना ब्रेल लिपीतील मतदार पत्रिका होत्या. वैद्यकीय सुविधा, पिण्याचे पाणी, उन्हापासून बचाव होण्यासाठी शेड, प्रतीक्षा कक्ष तसेच प्रथमोपचार पेटीसह ओआरएस सुविधाही होती.

















