- नागरिकांच्या समस्यांना वाली कोण?
- महापालिका आणि क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पसरलाय शुकशुकाट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हेंबर २०२४) :- विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेचे बहुतांश अधिकारी व कर्मचारी गुंतले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या विविध विभागांचे तसेच, क्षेत्रीय कार्यालयांचे दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे. अधिकारी व कर्मचारी इलेक्शन ड्युटीवर असल्याने महापालिका तसेच, क्षेत्रीय कार्यालये ओस पडली आहेत. काम होत नसल्याने नागरिकांना निवडणूक निकालानंतर येण्यास सांगितले जात आहे.
महापालिकेचे ४ हजार अधिकारी व कर्मचारी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कामास नेमण्यात आले आहेत. महापालिकेचे तब्बल ३ हजार ९६२ अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत. त्यामध्ये वर्ग दोन व तीनचे २ हजार ३५२ अधिकारी व कर्मचारी आहेत. वर्ग चारचे १ हजार ६१० कर्मचारी आहेत. पीआरओ, एफपीओ, ओपीओ, बीएलओ, झेडओ, एमओ विभागात एकूण १ हजार २१५ कर्मचारी तैनात आहेत. चिंचवडसाठी १ हजार १४० अधिकारी व कर्मचारी, पिंपरीसाठी १ हजार ४१९ अधिकारी व कर्मचारी आणि भोसरी मतदारसंघासाठी १ हजार ८ कर्मचारी काम करीत आहेत.
अधिकारी व कर्मचारी इलेक्शन ड्युटीत असल्याने पालिका व क्षेत्रीय कार्यालयात येत नाहीत. त्यामुळे नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, आदींची कामे खोळंबली आहेत. फोन केल्यानंतर इलेक्शन ड्युटीला असल्याचे उत्तर दिले जात आहे. नगर रचना, बांधकाम परवानगी, आकाशचिन्ह व परवाना, मालमत्ताकर, मालमत्ता हस्तांतरण, पाणीपट्टी, आरोग्य, ड्रेनेज, रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा, नागरी सुविधा केंद्र, विविध परवाने आदीविषयक कामे प्रलंबित राहत आहेत. तक्रारींवर कार्यवाहीसाठी अधिक कालावधी जात आहे. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
दोन डिसेंबरपासून कामकाज सुरळीत होण्याची शक्यता…
निवडणुकीसाठी बुधवारी (दि. २०) मतदान होत आहे. मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल शनिवारी (दि.२३) लागणार आहे, त्यानंतर सोमवार (दि. २५) पासून अधिकारी व कर्मचारी महापालिका व क्षेत्रीय कार्यालयात रूजू होतील. परिणामी, नियमितपणे दैनंदिन कामकाज सुरू होण्याची शक्यता आहे. तर, २ डिसेंबरपासून सर्व अधिकारी व कर्मचारी कामावर हजर होतील, असे सांगितले जात आहे.

















