न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हेंबर २०२४) :- पिंपरी चिंचवड महापालिकेकडून वाहनांच्या पार्किंगसाठी घेतलेल्या जागेचा वापर आता महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) व्यावसायिक कारणांसाठी करण्यात येणार आहे. एकीकडे प्रवाशांना वाहनांना पार्किंगसाठी जागा नसताना पालिकेच्या जागांचा व्यावसायिक वापर का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पिंपरी ते स्वारगेटपर्यंत विस्तारित मेट्रो सेवा सुरू झाली आहे. पिंपरी आणि पुणे हे दोन शहरे मेट्रो मार्गाने जोडल्यामुळे मेट्रो प्रवाशांची संख्या वाढली आहे. प्रवाशांना घर ते मेट्रो स्टेशनपर्यंत येण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल) फीडर सेवा सुरू करण्यात आली आहे. पण, बसची वांरवारिता, वेळ आणि प्रशासनाचे अयोग्य नियोजन यामुळे फीडर सेवेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असल्याचे दिसून येते. तसेच रिक्षाचे दरही जास्त असल्यामुळे बरेच प्रवासी मेट्रो स्थानकापर्यंत येण्यासाठी स्वतःची वाहने घेऊन येतात. पण, स्थानकांवर वाहनांची पार्किंगची सुविधा नाही. त्यामुळे पदपथावर, रस्त्यावरच वाहने पार्किंग करावी लागत आहे. रस्त्यावर वाहन पार्किंग केल्यावर वाहतूक पोलिस फोटो काढून ऑनलाइन दंड लावतात.
महामेट्रोने मेट्रो स्टेशनवर पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. मेट्रो प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात पुणे आणि पिपरी चिंचवड शहरातील आठ स्थानकांवर पे अॅण्ड पार्क सुविधा सुरु करण्याची घोषणा केली होती. त्याचे दरही निश्चित केले होते. यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून काही जागा हस्तांतरित केल्या होत्या. मात्र नऊ महिन्यातच प्रशासनाने निर्णय बदलला आहे. आता या जागेचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मेट्रो प्रशासन प्रवाशांच्या सुविधांऐवजी उत्पन्नवाढीवर लक्ष केंद्रित करत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
मेट्रो प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. भविष्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच प्रवाशांच्या वाहनांना पार्किंग सुविधा देणे शक्य नाही. त्यामुळे सध्या पार्किंग योजना गुंडाळली आहे. प्रवाशांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत
– हेमंत सोनावणे, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो…

















