न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२४) :- अजित पवार गटाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी रविवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची एकमताने निवड करण्यात आली. अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक रविवारी मुंबईतील अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी पार पडली. या बैठकीत पक्षाबाबतचे विधिमंडळातील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार अजित पवारांना देण्यात आले.
देवगिरी या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच यावेळी विधिमंडळ सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सर्व आमदारांचा पवार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ तसेच सर्व आमदार उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने ५९ जागा लढवत तब्बल ४१ जागांवर यश संपादन केले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपासून राज्यात राजकीय अस्तित्वासाठी धडपडणाऱ्या अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे. निवडणुकीतील यशानंतर अजित पवार गटाने महायुतीतील भाजप-शिंदेसेना या घटक पक्षांसोबत सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत.
















