- इच्छुकांकडून पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणीला सुरुवात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२४):- पिंपरी-चिंचवडमधील तिन्ही जागा महायुतीने जिंकल्या आहेत. त्यामुळे मंत्रिपदासाठी भाजपकडून आमदार महेश लांडगे, विक्रमी मतांनी निवडून आलेले शंकर जगताप यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
विधानसभेच्या आखाड्यात महायुतीने बाजी मारली आहे. भोसरीतून लांडगे, चिंचवडमधून जगताप, पिंपरीतून अण्णा बनसोडे विजयी झाले आहेत. आजवर पिंपरी-चिंचवड शहराला एकदाही मंत्रिपद मिळालेले नाही, त्यामुळे इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
गेल्या पंचवार्षिकमध्ये भोसरीतील आमदार लांडगे किंवा चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यापैकी एकाला संधी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, राजकीय स्थित्यंतरांमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. त्यामुळे कोणालाही संधीमिळाली नाही. लांडगे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत, तर चिंचवडमधून
शंकर जगताप आमदार झाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांचा विचार करता शहरात मंत्रिपद दिले, तर महापालिकेत पुन्हा सत्ता येण्यासाठी बळ मिळू शकते. अमित गोरखे यांच्या रूपाने विधानपरिषदेवर अनुसूचित जाती-जमातीला संधी देण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पिंपरी-चिंचवडमधील विधानसभा आणि विधानपरिषदेवरील प्रत्येकी दोन आमदार फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे मंत्रिपदासाठी कोणाला संधी मिळणार, याची चर्चा रंगली आहे. इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
विधानसभेला इच्छुक असणाऱ्या आणि माघार घेणाऱ्या नाना काटे, शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, मोरेश्वर भोंडवे यांचे पुनर्वसन करणार का, याचीही चर्चा रंगली आहे.
पिंपरीतून अजित पवार गटाने विजय मिळवला आहे. त्यामुळे आमदार बनसोडे यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो. नव्या मंत्रिमंडळामध्ये कुणाची वर्णी लागणार, याची चर्चा रंगली आहे. त्यानुसार प्रत्येक जण आपापली मोर्चेबांधणी करत आहे.












