- वृक्षारोपण केलेल्या रावेत मेट्रो इको पार्कमधील झाडे मृतावस्थेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२४):- रावेत येथील मेट्रो इको पार्कमध्ये लावलेली झाडे योग्य निगा न राखल्याने सुकली आहेत. त्या ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. झाडांची निगा राखली जात नाही. यामुळे या पार्कमधील शंभरहून अधिक झाडे मृतवत होत चालली आहेत.
पिंपरी ते दापोडीपर्यंत मेट्रोच्या कामासाठी बाधित होणाऱ्या झाडांच्या पुनर्वसनासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने मेट्रोला २०१७ मध्ये ५ एकरांचा भूखंड दिला होता. त्या जागेवर महामेट्रोने सुमारे हजार वृक्षांची लागवड केली होती. तसेच, नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक व सुशोभीकरण करून हा भूखंड पीएमआरडीएला हस्तांतरीत केला होता.
निष्काळजीपणामुळे या पार्कमधील १४० झाडे पाण्याविना जळाली होती. असे असताना पुन्हा पार्कमधील काही झाडे सुकली आहेत. बिल न भरल्याने येथील वीजपुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे येथील झाडांना पाणी घालण्यासाठी कर्मचाऱ्यांना अडचण येत आहे. टैंकरनेदेखील झाडांना पाणी घातलेले नाही. त्यामुळे येथील झाडे वाचविणे अवघड झाल्याचे कर्मचारी सांगत आहेत. शंभरहून अधिक झाडे मृत पावली आहेत. चेरी, पळस, बेहडा, आपटा, आंबा, करंज, सिंदूर, कल्पवृक्ष, रुद्राक्ष, नागकेशर, तुती, कृष्ण वड, पिंपळ, जांभूळ, शमी या वृक्षांसह अनेक दुर्मिळ जार्तीची झाडे येथे आहेत.
ही जागा कार्यालयाकडून जिल्हाधिकारी निवडणूक आयोगाकडे हस्तांतरित झालेली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून झाडांची योग्य काळजी घेतली जात नसल्याचा आरोप वृक्षप्रेमींकडून होत आहे.
सुकलेली झाडे वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. हरित लवादाच्या आदेशानंतरही पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मेट्रो इकोपार्कमधील झाडांची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे झाडे पाण्याअभावी सुकली आहेत. त्याला जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी तक्रार ग्रीन आर्मीचे प्रशांत राऊळ यांनी केली आहे.












