न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२४) :- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मोहाने ऐनवली नानावले पंचक्रोशीत सध्या वाघाने धुमाकूळ घातला आहे. ग्रामस्थ व शेतकरी वर्गामध्ये कमालीची घबराट निर्माण झाली आहे. मोहाने गावच्या रहाटीमधील तीन-चार जनावरांचा तसेच ऐनवली व नानावले गावातील लहान वासरांचाही या वाघाने फडशा पाडला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
दुचाकीवरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनाही कधीही कुठल्याही वेळेत या वाघाचे दर्शन घडत आहे. त्यामुळे रस्त्याने चालत यायला जायलाही नागरिक घाबरत आहेत. जोपर्यंत या वाघाचा बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत घराबाहेर न पडण्याचा विचार काही लोकांनी केला. घरात बसून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे काय? असा प्रश्नही त्यांना सतावत आहे.
या वाघांचा बंदोबस्त करून परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, असे पत्र वनविभाग अधिकारी खेड तसेच दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांना सामाजिक कार्यकर्ते रुपेश मोरे यांनी दिले आहे.
















