न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२४) :- थंडीचा हंगाम सुरू झाला आहे. कचरा जाळणे, शेकोटी पेटविण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यांच्यावर कारवाई करा. रस्ते नियमितपणे स्वच्छ करा. आवश्यक ठिकाणी रस्ते धुवून घ्या. खराब रस्ते दुरुस्त करा. शहरातील वाढलेले हवाप्रदूषण कमी करा, असे आदेश महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
शहरातील थेरगाव, वाकड, काळा खडक, भूमकर वस्ती या भागांत हवाप्रदूषण वाढल्याचे दिसत आहे. एअर कॉलिटी इंडेक्स अतिधोकादायक स्थितीत गेला आहे. त्याची दखल घेऊन आयुक्त सिंह यांनी तातडीने बैठक घेतली.
या वेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकात इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर, सर्व आठ क्षेत्रीय अधिकारी, पर्यावरण, ड्रेनेज, स्थापत्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्त सिंह म्हणाले की, शहरात थंडी वाढल्याने शेकोटी पेटविली जात आहे. तसेच, काही ठिकाणी कचरा जाळला जात आहे. त्यामुळे वायू प्रदूषण वाढत आहे. तसेच, रस्ते स्वच्छ न केल्याने तसेच, नादुरुस्त व खड्डेमय रस्त्यांमुळे धूळ उडून हवेत धुळीचे प्रमाण वाढत आहे. शेकोटी पेटविणारे व कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई करा. तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
















