- नो पार्किंगमध्ये वाहन पार्क केल्यास जीएसटी सह थकीत दंडही वसूल होणार..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ डिसेंबर २०२४) :- पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी टोईंग कारवाईला पुन्हा सुरुवात केली आहे. नो पार्किंग झोनमध्ये वाहने पार्क करणे वाहन चालकांना चांगलेच महागात पडणार आहे. नो पार्किंगमध्ये वाहन पार्क केल्यास जीएसटी सह वाहनावरील यापूर्वीचा थंकीत दंडही वसूल केला जाणार आहे.
शहरातील मध्यवर्ती व वर्दळीच्या मार्गावर ही कारवाई केली जात आहे. त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. अनेकजण अस्ताव्यस्त, बेकायदेशीरपणे दिसेल त्या ठिकाणी वाहने पार्क करतात. त्यामुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत भर पडत आहे. बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईसाठी वाहतूक पोलीस आता टोईंग वाहनांचा आधार घेणार आहेत.
नो पार्किंग मध्ये पार्क केलेली वाहने जवळच्या वाहतूक शाखेत जमा केली जातील. तिथून नागरिकांना आपली वाहने सोडवून घेता येतील. शहरात एकूण २५ वाहनांद्वारे कारवाई केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आठ वाहने कार्यान्वित झाली आहेत.
दुचाकी वाहनांसाठी ५०० रुपये दंड, २०० रुपये टोईंग चार्ज, ३६ रुपये जीएसटी असा ७३६ रुपये दंड आकारला जात आहे. तर चारचाकी वाहनांसाठी ५०० रुपये दंड, ४०० रुपये टोईंग चार्ज आणि ७२ रुपये जीएसटी असा ९७२ रुपये दंड आकारला जात आहे. टोईंग केलेल्या वाहनावर पूर्वीचेचलन आहे का, याची वाहतूक पोलीस तपासणी करतील. प्रलंबित चलनांपैकी एक आणि आताच्या कारवाईचे चलन किमान भरणे बंधनकारक असणार आहे.
अडीच वर्षांनंतर पुन्हा कारवाई…
यापूर्वी महापालिकेने पार्किंग पॉलिसी राबविण्यासाठी वाहतूक पोलिसांना मार्च २०२२ मध्ये टोइंग व्हॅन उपलब्ध करून दिल्या होत्या. यातील टोइंग व्हॅनचे चार्जे स महापालिका घेणार होती तर पोलिसांनी केलेला दंड शासनाकडे जमा होणार होता. महापालिकेने घेतलेला दंड पोलीस यंत्रणांमध्ये विविध सकारात्मक बदल करण्यासाठी वापरण्यात येणार होता. आता दंडाची सर्व रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा होणार आहे.











