- महापालिका आयुक्तांचा आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ डिसेंबर २०२४) :- महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयातील १८ लाख ६६ हजार ३८८ रुपयांचा दैनंदिन भरणा विलंबाने करून लिपिकाने अपहार केल्याचे उघड झाले आहे. विशेष लेखापरीक्षण अहवालात ही बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी आकाश गोसावी या लिपिकाची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
जिजामाता रुग्णालयात होत असलेला हा गैरव्यवहार महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष सायली नढे यांनी माहिती अधिकारातून उघडकीस आणला होता. त्यावेळी वैद्यकीय विभागाने या प्रकरणाची चौकशी केली असता, १८ लाख ६६ हजार ३८८ रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले. या प्रकरणात हा लिपिक प्राथमिक चौकशीत दोषी आढळला असून, त्याची विभागीय चौकशी सुरू केली आहे.
हा लिपिक जिजामाता रुग्णालयातील जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील नियमावली न पाळता, अनेक दुरुस्ती प्रकरणे व नोंदींच्या दुरुस्त्या वरिष्ठांची परवानगी न घेता व नियोजित कार्यप्रणालीचा अवलंब न करता अवैधरीत्या करीत असल्याचे समोर आले आहे. तसेच अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांची प्रकरणे रखडून ठेवणे, फाइल, नस्ती गहाळ करणे, दैनंदिन भरणा न करणे, नेमून दिलेले कामकाज न करणे, प्रकरणी वेळोवेळी सूचना व हलगर्जीपणास्तव वेळोवेळी कारणे दाखवा नोटीस देऊनही त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा होत नसल्याने या लिपिकावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने शाखाप्रमुखांनी शिफारस केली असल्याचे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे











