- पिंपरी चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेकडून कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०२४) :- बनावट पोलीस व्हेरीफिकेशन प्रमाणपत्र बनवणारे एजंट व त्यांना मदत करणाऱ्यांवर पिंपरी चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेने कारवाई केली आहे.
पोलिसांनी मर्मस्थळांना (महत्वाच्या आस्थापना) भेट देवून त्याठिकाणी करार पध्दतीने कामास असणारे ड्रायव्हर्स, हाऊस किपींग स्टाफ, सुरक्षा रक्षक व इतर खाजगी इसमांची तपासणी केली होती. सादर केलेल्या पोलीस व्हेरीफिकेशन सर्टिफिकेट्स बाबत पडताळणी केली. संबंधितांची सखोल चौकशी केली असता टीसीएल कंपनी, दिघी या संवेदनशील ठिकाणी करार पध्दतीने कामास असणाऱ्या अनेक इसमांनी सादर केलेले पोलीस व्हेरीफिकेशन सर्टीफिकेट्स हे बनावट आहेत किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे तयार केल्याचे आढळले आहे. सुमारे ४१ पोलीस व्हेरीफिकेशन सर्टिफिकेट्स प्रथमदर्शनी बनावट असल्याचे आढळुन आले आहेत.
ड्रायव्हर्स, सिक्युरीटी गार्ड व हाऊस कीपिंग स्टाफ हे एजंटला समक्ष भेटलेले नाहीत. तसेच ते दिघी, आळंदी, च-होली इ. वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्यास पीसीसी प्राप्त होत. त्यासाठी केवळ एजंटला त्यांचे मोबाईल फोनवर व्हॉटसअॅप व्दारे कागदपत्रे व ऑनलाईन प्रत्येकी १२०० ते १६०० रु. पाठविले की दहा ते पंधरा दिवसांनी मोबाईलवर पीसीसीची पीडीएफ एजेंट पाठवीत असल्याचे निदर्शनास आले. त्याशिवाय काही व्यक्तींचे पीसीसी हे येरवडा पोलीस स्टेशन येथून तर काही व्यक्तींचे पीसीसी हे चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथुन साधर्म्य असणाऱ्या पत्त्यांवरुन बनविलेले असल्याचे पोलिसांना दिसुन आले आहे. काही पीसीसी प्रमाणपत्रे ही असंबंध व बनावट पत्त्यांवर बनावट पोलीस स्टेशनचे नावावर बनविले असल्याचे निदर्शनास आले आहे.
पिंपरी चिंचवड पोलीसांचे आवाहन…
आपल्या आस्थापनेमध्ये कामास असणाऱ्या इसमांचे पोलीस व्हेरीफिकेशन नियमानुसार करुन घ्यावे. तसेच त्यांनी सादर केलेली पोलीस व्हेरीफिकेशन सर्टीफिकेट्स हे खरी आहेत की नाही याची तपासणी जवळच्या पोलीस स्टेशन येथुन किंवा पोलीस आयुक्त कार्यालय, प्रेमलोक पार्क, पिंपरी चिंचवड येथे विशेष शाखा-२ येथुन किंवा दहशतवाद विरोधी शाखा, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कार्यालय, भोसरी एमआयडीसी येथुन करुन घ्यावे.
















