न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२४) :- ‘अंदाजपत्रकात नागरी सहभाग’ या महापालिकेच्या उपक्रमात २ हजार २८४ नागरिकांनी प्रतिसाद देत कामे सुचविली आहेत. यामध्ये शहरातील विविध भागांतून नागरिकांनी रस्ते, सांडपाणी, आरोग्य, उद्याने, क्रीडांगणे आणि इतर सार्वजनिक सुविधांबाबत ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले आहेत. या अंदाजपत्रकांमध्ये सुचविलेल्या कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात येणार आहे. त्यानंतर त्या कामांसाठी प्रत्येक प्रभागाला दहा टक्के निधी देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.
शहरातील विविध उपक्रम, प्रकल्प यामध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी पालिकेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या मागणीनुसार संबंधित परिसरांमध्ये विकासकामे करण्यासाठी मदत होणार आहे. पीसीएमसी स्मार्ट सारथी या मोबाइल अॅपच्या माध्यमातून सूचना ऑनलाइन पद्धतीने नोंदविल्या आहेत.
महापालिकेच्या अंदाजपत्रकांसाठी सुचविलेल्या सूचनांमध्ये ८२ टक्के पुरुषांनी सहभाग घेतला आहे. तर महिलांचे प्रमाण फक्त २८ टक्केच आहे. त्यातही महिलांनी कचरा व्यवस्थापनावर भर दिला आहे. अभियानात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने जनजागरण मोहीम राबविण्यात आली होती. ब, ड आणि ग प्रभागांतून सगळ्यात जास्त नागरिकांनी सूचना केल्या आहेत. यामध्ये व प्रभागातून ४४१, ड प्रभागांतून ५४९ आणि ग प्रभागातून ५०३ नागरिकांनी सूचना केल्या आहेत. तर सगळ्यात कमी ह प्रभागातून १२१ जणांनीच सूचना केल्या आहेत.रस्ते, पार्क, वेस्ट मॅनेजमेंट आणि फुटपाथ यावर जास्त नागरिकांनी सूचना केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक प्राधान्यक्रम हा रस्त्यांना देण्यात आला आहे.
महापालिका या वर्षी प्रथमच असा उपक्रम राबवीत आहे. प्रत्येक कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रभागस्तरावर सूचनांचे अवलोकन करण्याचे काम करण्यात येत आहे. त्यांच्याकडून प्रक्रिया पूर्ण झाली की त्यांचा समावेश अंदाजपत्रकात करण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकांमध्ये प्रभागनिहाय एकूण बजेटच्या दहा टक्के म्हणजेच ९४.८६ कोटींचा निधी राखीव ठेवण्यात येणार आहे.
– प्रवीण जैन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, महापालिका…











