- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः आज आमदारांना फोन लावणार..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०२४) :- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपूरच्या राजभवनात दुपारी होणार आहे. १६ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असताना एक दिवस आधी हा शपथविधी होईल.
१९९१ नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. राजभवनच्या हिरवळीवर रविवारी दुपारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील.
मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार आणि कोणाला नाकारली जाणार याची राजकीय वर्तुळात दिवसभर जोरदार चर्चा होती. मंत्रिपद ज्यांना दिले जाणार आहे त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी दुपारनंतर फोन करणार आहेत. ‘तुम्हाला शपथ घेण्यासाठी यायचे आहे’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतरच मंत्रिपद मिळणार हे नक्की मानले जाते.
मंत्रिमंडळाचा विस्तार १४ डिसेंबरला होणार म्हणून मंत्रिपदासाठीचे इच्छुक आमदार मुंबईत पोहोचले होते, पण आता शपथविधी नागपुरात होणार असल्याने तेही नागपूरकडे निघाले. नागपुरातील राजभवनच्या हिरवळीवर रविवारी शपथविधी होणार आहे.
शपथविधी १४ डिसेंबरला मुंबईच्या राजभवनवर करण्याचे आधी सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री कार्यालयाने राजभवनला शपथविधीची तयारी करण्याची विनंती करणारे पत्रदेखील दिले होते. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये तयारीही सुरू झाली होती. शुक्रवारी दुपारी राजभवनला मुख्यमंत्री कार्यालय आणि राजशिष्टाचार विभागाने कळविले, की शपथविधी समारंभ हा नागपूरला होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि त्यांना शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्याची विनंती केली.
















