- देहू नगरपंचायत हद्दतील शासकीय गायरान जमिनीवर ६३८ अनधिकृत बांधकामे..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०२४) :- देहू नगरपंचायत हद्दीतील शासकीय गायरान जमिनीवरील बेकायदेशीर पत्राशेड, बांधकामांसह झालेली अतिक्रमणे काढण्याच्या निर्णयासह मुख्य प्रवेशद्वाराला रंगरंगोटी करण्याचे, तर गणेशोत्सवातील गणेश विसर्जन कामाच्या ठेकेदाराचा अतिरिक्त झालेला खर्च देणे, तसेच विविध विभागांतील कामांच्या निविदेला मंजुरी देण्यात आली.
देहू नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा शुक्रवारी नगराध्यक्षा पूजा दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, उपाध्यक्ष मयूर शिवशरण, पाणीपुरवठा सभापती सुधीर काळोखे, गटनेता योगेश परंडवाल, योगेश काळोखे, प्रवीण काळोखे, पूनम काळोखे, स्मिता चव्हाण, प्रियांका मोरे, रसिका काळोखे यावेळी उपस्थित होते.
शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांवर कारवाई…
शासकीय गायरान जमिनीमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासकीय जमिनीवरील ६२ घरकुल आणि २६६ नोंदी वगळता दोन वर्षांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणानुसार ६३८ अतिक्रमणे आढळले होती. यात ३०० हून अधिक पक्की बांधकामे, तर पत्राशेड आहेत. मात्र, दोन वर्षांत आणखी अतिक्रमणे वाढली आहेत. शासन निर्णयानुसार २०११ पूर्वीची नोंदी वगळता इतर अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी तहसीलदार यांच्याकडे पत्रव्यवहार करणे व कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. गणेशोत्सवातील मूर्ती संकलन आणि कृत्रिम कुंड उभारण्याच्या देण्यात आलेल्या कामामध्ये झालेल्या अतिरिक्त खर्चाला मंजुरी देण्यात आली.
















