न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे/ पिंपरी (दि.१६ डिसेंबर २०२४ ) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) बांधण्यात आलेल्या सेक्टर १२ आणि ३० व ३२ या गृह प्रकल्पात शिल्लक गाळ्यांच्या (दुकान) विक्रीसाठी अर्ज मागवले जाणार आहेत. याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली असून येत्या महिनाभरात त्याबाबत कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती पीएमआरडीएच्या अधिका-याने सांगितली.
पीएमआरडीएअंतर्गत पेठ क्रमांक १२ येथे ४ हजार ८८३ तर, पेठ क्रमांक ३०-३२ या ठिकाणी ७९२ सदनिकांचा प्रकल्प उभारण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा किमतीमध्ये ही घरे बांधली आहेत. या सदनिकांबरोबरच दुकाने देखील बांधण्यात आली आहेत. मात्र, त्यातील काही दुकाने शिल्लक राहिली आहेत. येथील २३ शिल्लक दुकानांची विक्री करण्यासाठी सोडत काढून अर्ज मागविले जाणार आहेत. सदनिकांच्या लॉटरीला मोठा प्रतिसाद मिळाला.
सद्यस्थितीमध्ये १२५० घरे रिकामी आहेत. त्यासाठी ५ हजार ८३१ जणांनी अर्ज केले आहेत. २९७८ जणांनी अनामत रक्कम जमा केली आहे. या योजनेसाठी दोन वेळा मुदतवाढ देखील देण्यात आली. एनईएफटी व आरटीजीएस या माध्यमातून अनामत रक्कम भरणाऱ्या नागरिकांना १७ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
















