- केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घेणार राज्य सरकारसोबत बैठक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२४) :- गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला आता गती मिळणार आहे. या मार्गिकेसंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे राज्य सरकार सोबत लवकरच संयुक्त बैठक घेणार असल्याची माहिती मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
खासदार बारणे यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेत तिसऱ्या आणि चौथा ट्रॅक, लोणावळा आणि कर्जतमधील घाट क्षेत्रात टनेल निर्माण करणे, कोल्हापूरला जाणारी सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा सुरू करणे आणि तिला देहूरोड येथे थांबा देणे, पुणे-जोधपूर रेल्वे दररोज सुरू करण्याची आणि चिंचवड स्टेशनवर थांबा देण्याची मागणी केली आहे. त्याला मंत्री वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
खासदार बारणे यांनी गेले काही वर्ष सातत्याने पाठपुरावा करुन पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसर्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. खासदार बारणे म्हणाले,पुणे ते लोणावळा या लोकलमधून दररोज एक लाख नागरिक प्रवास करत आहेत. पुणे-लोणावळा लोहमार्गावरील रेल्वे गाड्या दोन ट्रॅकवरून धावत आहेत. या मार्गावर तिसर्या आणि चौथ्या ट्रॅकसाठी 2017 मध्ये मान्यता दिली आहे. याबाबतचा सर्व्हेही झाला आहे. ट्रॅक उभारण्यासाठी रेल्वे विभागाकडे जमीनही उपलब्ध आहे. परंतु, सात वर्षे होत आले पण काम सुरू झाले नाही. ट्रॅकचे काम झाल्यानंतर लोकल आणि एक्स्प्रेसही धावतील. त्यामुळे रेल्वेला आर्थिक फायदा होईल. पुणे ते मुंबई असा दररोजचा प्रवास करण्याऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचे काम तत्काळ सुरू करावे. यासंदर्भात राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी.
लोणावळा आणि कर्जतमधील घाट क्षेत्रात टनेल निर्माण करा
पुणे आणि मुंबई दरम्यान दररोज लाखो प्रवासी प्रवास करत आहेत. त्यात नोकरदार, व्यापारी, स्थानिक नागरिक, विद्यार्थ्यांचा समावेश आहे. लोणावळा आणि कर्जत दरम्यान रेल्वे गाडी चालण्यासाठी दोन इंजिनचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे येथे टनेलची निर्मिती करणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात येथून लांब पल्ल्याच्या, एक्स्प्रेस आणि लोकलही धावू शकतील. त्यामुळे लोणावळा आणि कर्जतमधील घाट क्षेत्राचे सर्वेक्षण करावे. टनेल निर्माण करण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली.
कोल्हापूरला जाणारी सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा सुरू करा
कोरोना काळात बंद केलेल्या अनेक रेल्वे गाड्या पुन्हा सुरू केल्या. परंतु, मुंबई, पुणे अशी कोल्हापूरला जाणारी सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा सुरु केली नाही. मुंबई, पुणे, कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही एक्स्प्रेस अतिशय महत्वाची आहे. कोरोनानंतर
प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ही एक्स्प्रेस पुन्हा सुरू करावी. या एक्स्प्रेसला देहूरोड स्थानक येथे थांबा द्यावा. जेणेकरून या स्थानकावरून हजारो प्रवाशी पुणे, मुंबई प्रवास करतात. त्यांना सुविधा निर्माण होईल, असे खासदार बारणे यांनी म्हटले आहे.
पुणे-जोधपूर रेल्वे दररोज सुरू करा
पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात सद्यस्थितीत दहा लाख लोक राजस्थानशी संबंधित आहेत. या लोकांना व्यवसाय, कौटुंबिक कामासाठी राजस्थानला जावे लागते. परंतु, सध्या या मार्गावर सात दिवसातून एकदा रेल्वे धावत आहे. या रेल्वेला चिंचवडला थांबा देखील नाही. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्यापारी, विद्यार्थी, कामगार, पर्यटक यांच्यासाठीही या मार्गावर नियमितपणे रेल्वे सुरू करणे गरजेचे आहे. त्यामुळे पुणे-जोधपूर या सात दिवसांनी धावणारी रेल्वे दररोज सुरू करावी. चिंचवड स्टेशनवर थांबा देण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली आहे.

















1 Comments
tlover tonet
Just wanna input on few general things, The website design and style is perfect, the content is very superb : D.