- मुदत संपुष्टात येऊनही तब्बल तीनवेळा मुदतवाढ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२४) :- महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये पॅरामेडिकल स्टाफ आणि इतर मनुष्यबळ पुरवण्यासाठी खासगी एजन्सींची दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची मुदत संपल्यानंतरही तब्बल तीनवेळा त्या एजन्सींना मुदतवाढ देण्यात आली आहे.
महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय तसेच, इतर रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, इतर पॅरामेडिकल स्टाफ व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यामध्ये बीव्हीजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व रुबी एलकेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या दोन ठेकेदारी एजन्सीची ८ सप्टेंबर २०२१ ला दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कालावधी ३० सप्टेंबर २०२३ ला संपला. त्यानंतर नवीन एजन्सी नियुक्तीसाठी विविध कारणे देत प्रशासनाने त्यांना मुदतवाढ दिली आहे.
पहिली मुदतवाढ १ ऑक्टोबर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत होती. त्यानंतर १ ऑक्टोबर २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये दुसरी मुदतवाढ देण्यात आली. तर आता नवीन वर्षासाठी पुन्हा या एजन्सींना मुदतवाढ देण्यात आली आहे.
महापालिकेचे दवाखाने व रुग्णालयांमध्ये मनुष्यब पुरवण्यासाठी रुबी एलकेअर सव्हिसेस व बीव्हीजी इंडिया या एजन्सींना १ जानेवारी २०२५ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत या दोन्ही संस्थांना यापूर्वी १५ महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तर पुन्हा त्यांना तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तीन महिन्यांसाठी नियुक्त मनुष्यबळाचे एकत्रित वेतन, किमान वेतन, सेवा शुल्क व इतर अनुषंगिक रक्कम अदा करण्यासाठी १९ कोटी ६६ लाख ६९ हजार ५६९ रुपये खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीमध्ये मान्यता दिली आहे.
निविदा अटी व शर्तीमध्येच संबंधित एजन्सींना दोन वर्ष काम आणि त्यानंतर एक वर्ष वाढ देण्याची अट होती. त्यानंतर त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. निवडणूक आचारसंहिता असल्याने मनुष्यबळ पुरवण्यासाठीच्या नवीन निविदा प्रक्रियेचे काम पूर्ण झाले नाही. येत्या एक ते दोन महिन्यांमध्ये नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन त्यामध्ये येणाऱ्या एजन्सींची नियुक्ती करण्यात येईल, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.













1 Comments
tlovertonet
There is obviously a lot to know about this. I assume you made various nice points in features also.