- अनेक व्यावसायिकांकडे अग्नीसुरक्षा यंत्रणाच नाही..
- अनधिकृत बांधकामांच नुसतच फुटलयं पेव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जानेवारी २०२५) :- प्लास्टिक भंगारच्या गोदामाला बुधवार (दि. १) रोजी रात्री दोनच्या सुमारास आग लागली. त्यात लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. अग्निशामक दलाच्या पथकाने नऊ तासांनी आग आटोक्यात आणली. चिखली येथील भैरवनाथ मंदिरसमोरील मोकळ्या जागेत गोदाम आहे.
जाधववाडी, पवारवस्ती व मोशी रोड परिसरात आगीच्या वाढत्या घटना हा चिंतेचा विषय बनत आहे. अनेक व्यावसायिकांकडे अग्नीसुरक्षा यंत्रणा नसते. अग्निशमन विभागाचा नाहरकत दाखलाही घेतलेला नसतो. त्यामुळे अचानक आग लागल्यावर त्वरित नियंत्रण मिळवणे कठीण जाते. याकडे संबंधित विभागाने गांभीर्यपूर्वक लक्ष घालणे गरजेचे असल्याची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान महापालिकेच्या अग्निशामक विभागाने या परिसरातील चार हजारांहून अधिक बांधकामधारकांना नोटीस बजावल्या होत्या. त्यापैकी केवळ ४०० बांधकाम मालकांनी औपचारिकता पूर्ण करुन परवानगी घेतली आहे. तर परवानगी साठी एक हजार जणांनी अर्ज प्राप्त झाले आहेत.
मुळात येथील बहुतांश बांधकामे ही अनधिकृत आहेत. हजारो बांधकाम धारकांनी अग्निशामक विभागाची परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे पिंपरी- चिंचवड महापालिका अग्निशामक विभागाने या भागातील चार हजार बांधकामांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही हाती घेतली. नोटीस देण्यास सुरुवात केल्यापासून आजपर्यंत सुमारे ४०० नागरिकांनी आपल्याबांधकामांसाठी आवश्यक असणारी अग्निशामक विभागाची परवानगी घेतली आहे. तर, नव्याने परवाने घेण्यासाठी या भागातील सुमारे एक हजार अर्जदारांच्या फाइली प्राप्त झाल्या आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात अवैध रित्या भंगार व्यवसाय सुरु आहे. हजारोंच्या संख्येने लहान-मोठे व्यवसाय सुरु आहेत. परंतु या व्यावसायिकांनी अग्निशामकबाबतच्या नियमांचे पालन केलेले नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये दोनशेहून अधिक आगी लागलेल्या असताना देखील प्रशासनाकूडन ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. अखेर डिसेंबर महिन्यात लागलेल्या भीषण आगीनंतर अग्निशामक विभागाने नोटीस पाठविल्यानंतर आता कुठे परवाने घेण्याची औपचारिकता सुरु झाली आहे.
सर्वच बांधकामधारकांनी अग्निशामक विभागाच्या नियमावलीचे पालन करुन अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित केल्यास अगीच्या घटना आटोक्यात आणण्यास निश्चितपणे मदत होईल.
– मनोज लोणकर, उपायुक्त, अग्निशामक विभाग पिंपरी-चिंचवड महापालिका…













